जूनअखेरपर्यंत करता येणार अर्ज
। रायगड । प्रतिनिधी ।
राज्य सरकारने 1980 ते 2020 या कालवधीत दस्तनोंदणीवर कमी मुद्रांक शुल्क भरलेल्यांसाठी आणलेल्या दुसर्या टप्प्यातील ‘अभय’ योजनेला जून अखेरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र दुसर्या टप्प्यातील योजनेत पहिल्या टप्प्यापेक्षा मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेत मिळणारी सवलत कमी करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात रायगड जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाकडील 473 दाखल प्रकरणांमधून 47 कोटी 27 लाख रुपयांचा महसूल जमा झाला.
1980 ते 2020 या कालवधीत सदनिका घेतली असेल. परंतु मुद्रांक शुल्क कमी भरले असेल, अथवा 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करारनामा केला, मात्र रजिस्टर करण्यासाठी प्रकरण दाखल केले नाही, अथवा बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये दाखविलेल्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले असले, अशा नागरिकांसाठी राज्य सरकारने ‘अभय’ योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीसाठी एक आणि 1 जानेवारी 2001 ते 2020 या कालावधीतील दस्तांसाठी एक, असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. 1 डिसेंबरपासून 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत राज्य सरकारकडून सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील योजनेला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आली. आता दुसर्या टप्प्यातील योजनेला सुरुवात झाली आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी एका महिन्याची म्हणजे 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र या मुदतीत राज्य सरकारने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील मुदत जूनअखेरपर्यंत असणार आहे. परंतु मुद्रांक आणि दंडाच्या रकमेत पहिल्या टप्प्यात जी सूट देण्यात आली होती, ती दुसर्या टप्प्यातील योजनेत कमी करण्यात आली आहे.
योजनेचा पहिला टप्पा 29 फेब्रुवारी रोजी संपला. या टप्प्यात 473 दाखल प्रकरणांमधून 47 कोटी 27 लाख रुपयांचा महसूल जमा झाला. मात्र, मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडाची एकत्रित रक्कम पाच कोटींपेक्षा अधिक असलेली प्रकरणे पूर्वमान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहेत. योजनेचा दुसरा टप्पा 1 ते 31 मार्च असा होता. मात्र, नागरिकांचा या योजनेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता दुसर्या टप्प्यालाही 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यात मुद्रांक आणि दंडाच्या रकमेतली सवलत पहिल्या टप्प्याच्या तुलनेत कमी करण्यात आली आहे. या योजनेसाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या दस्तासाठी आपापल्या जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज करता येणार आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.
मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. दुसर्या टप्प्यातील योजनेची मुदत 31 मार्च रोजी संपत होती. त्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जून अखेरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.6 डिसेंबर 1985 पूर्वीच्या खरेदी-विक्री करारनाम्यांसाठी ही योजना लागू नाही. त्यांना तशी गरजही नाही. त्यामुळे आशा नागरिकांनी धावपळ करण्याची गरज नाही. मात्र, खरेदीखत अथवा डिड ऑफ अपार्टमेन्ट करावयाचे झाल्यास त्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
श्रीकांत सोनावणे, मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड