निजामपुरात नेत्र तपासणी शिबीर; 40 रुग्णांची शस्त्रक्रिया, 40 चष्मे वाटप
| माणगाव | प्रतिनिधी |
निजामपूर परिसरात सामाजिक बांधिलकीतून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा प्रशंसनीय उपक्रम नुकताच पार पडला. झुनझुनवाला व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल तसेच जमातूल मुस्लिमीन, मस्जिद व मस्जिद मोहल्ला, निजामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर रविवारी (दि.21) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत निजामपूर बसस्थानकासमोर यशफिन लॅबोरेटरी येथे पार पडले. यात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच विविध नेत्रविकारांवर उपचार करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तब्बल 300 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी 40 मोतीबिंदू रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर 40 नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन व संयोजन निजामपूर येथील जमातूल मुस्लिमीन मस्जिद व मस्जिद मोहल्ला संस्थेतर्फे करण्यात आले. यावेळी मस्जिद मोहल्ला अध्यक्ष अ. गणी हसन जळगावकर, छोटा मोहल्ला अध्यक्ष इलयास इस्माईल सांगळे, उपाध्यक्ष अ. रज्जाक उमर लोखंडे, खजिनदार शौकत उस्मान राऊत, सेक्रेटरी मुराद अहमद जळगावकर, निजामपूर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे, माजी सरपंच बाळाराम दबडे, रहिमत परदेशी, नुरमहमद राऊत, हसन मुजावर, मुस्तकीम सांगळे, मौलाना यासीर, मोहन कोळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. दोन्ही मोहल्यांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळीही उपस्थित होते.
संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीही मोफत रक्ततपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावर्षी नेत्र शिबिरानंतर पुढील काळात रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, हृदयरोग तपासणी, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील केलेल्या कामात नेहमीच सहकार्य करेन, अशी ग्वाही दिली. तर माजी सरपंच बाळाराम दबडे यांनी मुस्लिम समाजाने घेतलेल्या सामाजिक व शैक्षणिक पुढाकाराचे अभिनंदन करून, सर्व स्तरांतून संस्थेला मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
निजामपूरातील जमातूल मुस्लिमीन मस्जिद व मस्जिद मोहल्ला संस्थेने उचललेले हे पाऊल समाजासाठी दिशा दाखवणारे ठरत असून, आरोग्य शिक्षण आणि सामाजिक कार्यात मुस्लिम बांधवांची योगदान अधिकाधिक प्रभावीपणे दिसत आहे.
सर्व सेवा पूर्णतः मोफत
या शिबिरात डोळ्यांची तपासणी, शस्त्रक्रिया सेवा व सर्व प्रकारच्या उपलब्ध करून देण्यात आल्या. पडदा निसटणे, डायबेटीस (मधुमेह) मुळे पडद्यावरील दोष, डोळ्यातील पडद्याची सूज कमी करण्यासाठी इंजेक्शन, डायबेटीसी रेटिनोपॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया, तिरळेपणा शस्त्रक्रिया, बुबुळ बदलणे, पापणीवरील आजार उपचार, तसेच संगणकीय नेत्र तपासणीतून नंबरच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या सर्व सेवा पूर्णतः मोफत देण्यात आल्या.





