एलिफंटा बेटावर पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध

| उरण । वार्ताहर ।
प्रसिद्ध एलिफंटा बेटावर सणासुदीत येणार्‍या पर्यटकांना आनंद उपभोगण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि बेटावरील स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थांच्या रोजगार वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मंगळवार 21 डिसेंबर रोजी विविध शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत सर्वोतोपरी उपाययोजना करुन सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


एलिफंटा बेटावर दरवर्षी ख्रिसमस, 31 डिसेंबर, नवीन वर्षानिमित्ताने एलिफंटा लेणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. बेटावर येणार्‍या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना आनंद उपभोगता यावा आणि आवश्यक सोयी-सुविधा पुरवून पर्यटक आधारित स्थानिकांच्या रोजगार वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी उपाययोजना विविध शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांची मंगळवारी बेटावर बैठक बोलाविण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी पोलीसांकडे केली होती.ग्रामपंचायतीच्या मागणीनंतर मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मोहीते यांनी बेटावर विविध विभागाच्या शासकीय अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती.सरपंच बळीराम ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीसाठी मेरीटाईम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरिक्षक संजय पिंपळे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, भारतीय पुरातत्त्व सहाय्यक लेखाधिकारी विकास शिंदे, गेटवे एलिफंटा जल वाहतुक संस्थेचे प्रतिनिधी रईस, एसआयएस सिक्युरिटीचे सदस्य अजय मिश्रा, ग्रामपंचायत सदस्य मंगेश आवटे, मुकेश भोईर तसेच पोलीस सहकारी, स्थानिक हॉटेल व्यावसायिक यशवंत म्हात्रे, शेखर पडते, संतोष कोळी, लघु उद्योजक, लोकल गाईड, ग्रामस्थ उपस्थित होते.


मागील दीड -दोन वर्षे कोरोना काळातील पर्यटक बंदीमुळे घारापुरी बेटावरील रोजगार ठप्प झाला होता. मात्र दोन महिन्यांपासून बेटावर पर्यटक सुरू झाल्याने बेटावरील रोजगार सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. घारापुरी हे जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ असल्याने बेटावर लाखो देशी-विदेशी पर्यटक वर्षाकाठी येत असतात. तसेच ख्रिसमस तसेच सरत्या वर्षात येणार्‍या सुट्ट्यांच्या काळात बेटावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.त्यामुळे अशावेळी बेटावर पर्यटकांची गर्दी उसळल्यास पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता निर्धोकपणे बेटावर पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा,त्यांची सुरक्षा तसेच ग्रामस्थांच्या रोजगार वाढीस प्राधान्य निर्माण होईल, पर्यटकांची सुरक्षितता यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचा निर्णय या संयुक्तिक बैठकीत घेण्यात आला.

Exit mobile version