सर्वसामान्य शिवसैनिक संभ्रमात
| श्रीवर्धन | वार्ताहर |
शहर संघटनेने आयोजित केलेल्या ‘आती रहेगी बहारे’ या गीत गायनाच्या कार्यक्रमास जबाबदार पदाधिकार्यांनी येणं टाळले. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे व मोजकेच पदाधिकारी उपस्थित असल्यामुळे शहरातील नागरिकांना शिवसेना शहर संघटनेतील गटबाजी बघावयास मिळाली. अजूनपर्यंत संघटनेत मतभेद असायचे; पण काही क्षणांपुरते. पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. शहर संघटनेत काही महिन्यांपासून शहरप्रमुख, माजी विरोधी पक्षनेता विरुद्ध माजी गटनेता, उपशहरप्रमुख, माजी नगरसेवक असे पदाधिकार्यांचेच दोन गट पडले आहेत. पदाधिकार्यांच्या दोन गटांमुळे शिवसैनिकांची गळचेपी झाली असून, भविष्यात नगरपरिषदेवर भगवा फडकावणे राहिले दूर, शहरात शिवसेनेचे अस्तित्व राहील की नाही, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
हा कार्यक्रम पक्षवाढीसाठी आयोजित केला नव्हता. संघटनेनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पाठिंबा द्यायचा की बहिष्कार टाकायचा? तसेच तिन्ही आमदारांचा अगोदरपासून नियोजित कार्यक्रम ठरलेला असल्यामुळे ते या कार्यक्रमास हजेरी लावू शकले नाहीत.
राजेश चव्हाण, शहरप्रमुख
प्रत्यक्षात आमंत्रण पत्रिकेवर पदाधिकार्यांची नावे वगळली. ज्यांनी राष्ट्रवादीमधून नुकताच सेनेत प्रवेश केलाय, त्यांचे पत्रिकेत नाव तसेच संघटनेसाठी कुठलही योगदान नाही त्यांची नावे पत्रिकेत छापली. पक्षाचा कुठलाही प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून आम्ही अनुपस्थितीत राहिलो.
अनंत गुरव, माजी गटनेते







