सुषमा अंधारेंची सूचक पोस्ट
| मुंबई । वृत्तसंस्था ।
पंकजा मुंडे-महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट, देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागणं, पण त्याचवेळी नवनीत राणा यांना मात्र तासाभरात भेट या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोूद तावडेंनी चितपट केलं आहे, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. या पोस्टसोबत आता कधीच येणार नाही असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या व्हायरल घोषणेवरून हा खोचक टोला लगावल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यातही सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरून एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टचीही अशीच चर्चा चालू आहे.
2019 च्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवेळी विनोद तावडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विनोद तावडेंबरोबरच तेव्हा नाराजांमध्ये आता बीडमधून उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे, पुढच्याच वर्षी भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ खडसेंनी त्यांची नाराजी उघडपणे फडणवीसांविरोधात बोलूनही दाखवली होती. तेव्हापासून विनोद तावडेंना राष्ट्रीय राजकारणात वेगवेगळ्या जबाबदार्या दिल्या जात आहेत. सध्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी विनोद तावडेंवर आहे.