संजय राऊत यांचा हल्लाबोल
| मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार होते, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच सूरत येथे भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. हा भाजपाचा विजय नसून, लोकशाहीचे वस्त्रहरण आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सरकार कोणलाही विनाकारण अटक करत नाही, गुन्हेगार कितीही मोठा असला तर कायद्यासमोर सर्व समान आहेत, असे शिंदे यांचे दिल्लीतील बॉस नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अनेक मंत्र्यांना अटक केली. त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे सरकार देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांना अटक करणार होते, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. फडणवीस यांच्या त्यांच्या मनात अटकेची भीती का आली, त्यांनी काहीतरी केले असणार म्हणूनच त्यांच्या मनात भीती आली, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
विनाकारण कोणलाही अटक करता येत नाही. देवेंद्र फडणवीस बेकायदा फोन टॅपिंगमध्ये दोषी आहेत. त्याचा तपास सुरू होता. त्यामुळे आपल्याला अटक होईल, अशी भीती त्यांच्या मनात होती. आपण गुन्हा केला आहे, ही भावना असल्यानेच त्यांच्या मनात अटकेची भीती होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर असताना विरोधकांचे फोन टॅप करून माहिती मिळवण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावले होते. त्यातील रश्मी शुक्ला यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले. ते मागे का घेण्यात आले. चौकशी पूर्ण झाल्यावर सत्य सर्वांसमोर आले असते. त्यामुळे त्यांच्या मनात भीती होती, असेही संजय राऊत म्हणाले. फोन टॅपिंगचा गुन्हा गंभीर आहे. इतर देशात अशा आरोपांसाठी तात्काळ अटक करण्यात येते. असा गंभीर गुन्हा त्यांनी केल्यानेच त्यांच्या मनात भीती होती. ते डरपोक आहेत. आपल्याला अटक होऊ नये, यासाठीच त्यांनी शिंदेंवर दबाव आणून पक्ष फोडले. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करत उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, असेही संजय राऊत म्हणाले.
प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक लोन घोटाळ्याची चौकशी सुरू होती. तिथे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 10,15 लाखांच्या घोटाळ्यासाठी भाजपने अनेकांना अटक केली. असे असताना या दोघांना अटक का करण्यात आली नाही, भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा सवालही त्यांनी केला. फडणवीस, शेलार, गिरीष महाजन, प्रसाद लाड या सर्वांची चौकशी सुरू होती. दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्या शिंदे यांना विचारा की मोदी सरकार त्यांना अटक का करणार होते, असा सवाल त्यांना विचारा. तुम्ही आमदार फोडून आमच्यासोबत या, अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येईल, असा दबाव फडणवीस आणि मोदी सरकारने मिंध्यांवर आणला होता. हा सर्व खेळ भाजपने केला आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. हा बिनविरोध विजय नसून ही लूट आहे. याआधी आपल्या लोकशाहीत असे घडले नव्हते. सूरतमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले आहे. त्यामुळे देशातून हुकूमशाही नष्ट झाली पाहिजे, यासाठी आमची लढाई सुरू आहे. केंद्रात 100 टक्के सत्तापरिवर्तन होणार आहे. शिंदे, फडणवीस टोळी सत्तेत आल्यावर त्यांनी गुन्हे, चौकशा रद्द केल्या होत्या. आता सत्तापरिवर्तन झाल्यावर या चौकशी पुन्हा सुरू करून कायदेशारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.