प्रकाशमय परिसर ठेवण्यात प्रशासनाला अपयश

लाखो खर्चूनही चारफाटा चौक अंधारातच

। नेरळ । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे भागातून येणार्‍या पर्यटकांचे कर्जत तालुक्यात आल्यावर पहिले चारफाटा हे महत्वाचे ठिकाण आहे. मात्र, हाच चारफाटा हुतात्मा भाई कोतवाल चौक गेली अनेक महिने रात्रीच्या वेळी अंधारात असतो. शासनाने कर्जत चारफाटा चौक येथे परिसर उजळण्यासाठी हायमास्ट बसविला आहे, मात्र तेथे वीज पुरवठा केल्यानांतर येणारे विजेचे बिल कोण भरणार, असा प्रश्‍न असल्याने वीज पुरवठ्याविना तो हायमास्ट बंद अवस्थेत आहेत.

कर्जत तालुक्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या दररोज वाढत आहे. पूर्वी फक्त माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटक येथे येत होते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षात पर्यटक साप्ताहिक सुट्ट्यांशिवाय इतर दिवशीदेखील कर्जत तालुक्यात येऊ लागले आहे. शनिवार-रविवार या दोन दिवशी मुंबई-पुणेकडून येणार्‍या पर्यटकांमुळे कर्जत तालुक्यातील चारफाटा हे ठिकाण वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट बनला आहे. याच चारफाटा येथून कर्जत शहरात, माथेरान-नेरळकडे तसेच कर्जत स्टेशन आणि मुरबाडकडे रस्ता जातो. त्यामुळे या चौकात वाहनांची कायम वर्दळ असते. मात्र, याच चारफाटा येथे रात्रीच्या वेळी लक्क प्रकाशमय परिसर ठेवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

कर्जत चारफाटा येथे शासनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चून उभा करण्यात आलेले विजेचा हायमास्ट बंद अवस्थेत आहे. कर्जत चारफाटा येथे कर्जत नगरपरिषदेची हद्द संपते आणि पुढे दोन बाजूला हालिवली ग्रामपंचायतीची हद्द तर एका त्रिकोणातील भाग हा कर्जत नगरपरिषद हद्दीत येतो. यामुळे त्या पथदिव्यांवरील दिवे उजळण्यासाठी वीज कोणी द्यायची आणि त्या विजेच्या बिलाची रक्कम कोणी भरायची, हा प्रश्‍न समोर आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधून या हायमास्ट दिव्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, हा हायमास्ट ज्या ठिकाणी बसवलेला आहे ती जागा हलवली ग्रामपंचायतीची हद्दीतील आहे. हालिवली हि एका गावाची ग्रामपंचायत असल्याने या ग्रामपंचायतीचे महसुली उत्पन्न अत्यंत अल्प आहे. त्यामुळे चारफाटा येथील विजेच्या दिव्याचे बिल भरण्याची आर्थिक ऐपत नसल्याने हालिवली ग्रामपंचायतीने त्या हायमास्टवरील दिव्याचे बिल भरण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे चारफाटा चौकातील हायमास्ट हे बंद अवस्थेत आहे.

कर्जत पालिका एखादा हायमास्ट उभा करते आणि त्याला वीज पुरवठा करण्याची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलत नसल्याने पालिकेने आपली जबाबदारी समजून त्या हायमास्टसाठी विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. पालिकेने तो हायमास्ट उभारताना आपल्या हद्दीत उभारला असता तर विजेच्या बिलाचा प्रश्‍न आला नसता आणि त्यामुळे पालिकेने तो हायमास्ट तेथून काढून आपल्या हद्दीत उभा करावा.

– गुरुनाथ पालकर, माजी नगरसेवक

आमच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आणि उत्पन्न पाहिले तर ग्रामपंचायतीमधील कर्मचार्‍यांना महिना पगार कसा द्यायचा, असा प्रश्‍न असतो. यातच कर्जत पालिकेने त्या विजेच्या दिव्याचे वीज बिल भरण्यासाठी हालिवली ग्रामपंचायतीला सांगितले होते. मात्र, कर्जत नगरपरिषद सक्षम असून त्यांनीच हे बिल भरायला हवे.

– सुरेश बोराडे, ग्रामस्थ, हालिवली

Exit mobile version