बॅनरबाजीवर लगाम ठेवण्यात पालिकेला अपयश

मुख्यालयासमोरच झळकले राजकीय बॅनर

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

शहरातील बेकायदेशीर बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयासमोरच विनापरवानगी राजकीय बॅनरबाजी करण्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पनवेल पालिकेच्या मुख्यालयासमोरच हा प्रकार घडत असल्याने बॅनरबाजी करून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांकडून प्रशासनाला एका प्रकारे आव्हानच दिले जात आहे. यामुळे विनापरवानगी बॅनरबाजी करणाऱ्यांवर वचक बसवण्यात पालिकेचे अतिक्रमण विभाग अपयशी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

पालिका हद्दीत बॅनरबाजी करण्यासाठी पालिकेच्या परवाना विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बॅनरबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या बॅनरबाजी करणाऱ्यांमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, आपापल्या राजकीय पक्षाचे जाहिरात फलक लावून हे राजकीय पक्ष पालिकेच्या नियमाचे उल्लंघन करत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या बॅनरवर कारवाई करण्यात येत असते. मात्र, राजकीय पक्षाच्या बॅनरवर कारवाई करताना राजकीय नेते दबाव आणत असल्याने अतिक्रमण विभागातील कर्मचारी हतबल ठरत असल्याची माहिती अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

Exit mobile version