भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश

पादचाऱ्यांसह दुचाकीस्वार भटक्या कुत्र्यांचे टार्गेट


| धाटाव | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. विशेष करुन रात्रीच्या वेळी पादचारी तसेच दुचाकीस्वारांवर ते हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. धाटाव परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सर्वच पातळीवर अपयश आल्याचे चित्र आहे. भटक्या कुत्र्यांनी धाटाव परिसर, धाटाव नाका, बारसोली, विष्णूनगर, हुडको कॉलनी, मलखंडवाडी या ठिकाणी असलेल्या कचराकुंड्या, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायट्या, औद्योगिक वसाहत परिसर अशा ठिकाणी कुत्र्यांच्या टोळक्याचे वास्तव असल्याचे दिसून येते.

विविध ठिकाणी असलेले हॉटेल, मटण, चिकन, मच्छी विक्रेते त्यांच्याकडील कचरा कचराकुंडीत टाकला जातो. रस्त्यालगत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चायनीज दुकानांतून सुद्धा खाद्य पदार्थ हे भर रस्त्यातच टाकले जात आहेत. सदर कचऱ्याची विल्हेवाट नियोजित ठिकाणी योग्य पद्धतीने होत नाही. अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य अधिक आहे.

रस्त्याने जाणाऱ्या लहान शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी कामावरून घरी जात असताना कुत्री अंगावर धाऊन येत असल्याने दुचाकीचालकांचा तोल जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे सर्वत्र बेवारस कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. स्थानिक प्रशासन या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करणार का असा प्रश्न पडला आहे.
. . . . . . . .

Exit mobile version