मालगाडीचे घसरलेले डबे पूर्वपदावर आणण्यात अपयश

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्थानक परिसरात जेएसडब्ल्यूमधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे काल पाच ते सहा डबे रुळावरून घसरले होते. यामुळे कोकण रेल्वे वरील पनवेल स्थानकातून होणारी रेल्वे वाहतूक जवळपास थांबली होती. मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. घसरलेले मालगाडीचे डबे 24 तासानंतरही पूर्वपदावर आले नव्हते. पनवेल स्थानक व परिसरात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबविण्यात आल्या. यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले होते. यावेळी रेल्वे प्रशासनासह पनवेल शहर पोलीस,रेल्वे पोलीस व विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन प्रवाशांच्या अल्पोपहाराची सोय केली होती.

शनिवारी दुपारी मालगाडीला पनवेल रेल्वे स्थानक परिसरात अपघात झाला. पाच ते सहा डबे रुळावरून घसरले. मालगाडी घसरल्याने या मार्गावरील सर्व ट्रेन कित्येक तास थांबवण्यात आल्या होत्या. तुटलेले ट्रॅक बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. रोह्याकडे जाणारी एक मार्गिका काल रात्री उशिरा सुरू केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. असे असलेतरी या अपघातानंतर मेल,एक्स्प्रेस रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. रेल्वेने अनेक गाड्या ठाणे,पुणे येथून दुसऱ्या मार्गिकेकडे वळविल्या आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असून काही रद्द करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version