नेरळ पोलिसांसह पुरवठा विभागाची धडक कारवाई
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खांडस गावातील पेटारवाडी या ठिकाणी असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये बनावट गॅस सिलिंडर बनविण्याचा कारखाना चालविला जात होता. त्याबाबत नेरळ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांसोबत कारवाई केली आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल 75 गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर बनविण्याचे साहित्य असा दहा लाखांचा ऐवज हस्तगत केला असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
नेरळ येथील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील पेटारवाडीमधील बंद असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये बनावट गॅस सिलिंडर बनविण्याचा कारखाना सुरू होता. त्याबाबतची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. नेरळ ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तालुका पुरवठा अधिकारी रविंद्र दळवी यांना ही माहिती दिली. त्यानंतर पुरवठा अधिकारी आणि नेरळ पोलिसांनी मिळून त्याठिकाणी धाड टाकली. या कारवाईदरम्यान १० लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १०३ घरगुती सिलिंडर, १०० हून अधिक रिकामे व्यावसायिक सिलिंडर, 6 कॉम्प्रेसर, 7 इलेक्ट्रिक वजनकाटे, स्टिकर बंडल्स, पाईप-रेग्युलेटरसह बोलेरो पिकअप वाहन यांचा समावेश आहे. चेतन पांडुरंग खडे, हर्षद संतोष कालेकर आणि अंजली गॅस एजन्सी वितरक मुरबाड तसेच काही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चेतन व हर्षद यांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गच्चे करत आहेत. प्राथमिक तपासादरम्यान गॅस एजन्सी वितरकांचाही संबंध समोर आल्यामुळे त्या दिशेनेही चौकशी सुरू असल्याचे नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.







