अफवांवर विश्वास ठेऊ नये; जयंत पाटील यांचे मतदारांना आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सध्या निवडणूकीमुळे संपूर्ण वातावरण तापलं आहे. रायगड जिल्ह्यात शेकापला वाढता प्रतिसाद, सभांना होणारी गर्दी यामुळे विरोधकांना पराभवाची चाहूल लागली आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, पेण व अलिबागमध्ये शेकापने उमेदवार उभे केले असून उरण तसेच पेणमध्ये शेकापच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांनीही प्रीतम म्हात्रे तसेच अतुल म्हात्रे यांना पसंती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी शेकापचे खोटे पत्र व्हायरल करुन मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजपने हा रडीचा डाव केला आहे. या प्रकरणात ज्यांनी खोटे पत्र तयार करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली आहे.
मतदानाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी गलिच्छ राजकारण केले आहे. पेण व उरणमधील शेकापचे विजयी उमेदवार अतुल म्हात्रे व प्रीतम म्हात्रे या दोघांची उमेदवारी रद्द करुन भाजपच्या उमेदवारांना शेकापने पाठिंबा दिल्याचे खोटे पत्र विरोधकांनी व्हायरल केले आहे. या लेटरहेडवर दहा वर्षापूर्वीचे पदाधिकारी आहेत. त्यातील काही आज आपल्यामध्येही नाहीत. असे लेटरहेड वापरुन त्यांनी खोटे पत्रक तयार केले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. राजू कोरडे त्याबाबतची कार्यवाही करीत आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
विरोधकांनी जो खोडसाळपणा केला आहे, त्यावर पेण व उरणमधील शेकापचे कार्यकर्ते, मतदार, हितचिंतकांनी विश्वास ठेऊ नये. विरोधकांना पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांनी हे गलिच्छ कृत्य केले आहे. याचे मुख्य सुत्रधार उरणचे भाजप आ. महेश बालदी असल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करुन त्यांना अटक करावी. तसेच ज्यांनी हे पत्र व्हायरल केले आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबत सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, तसेच पक्षाची जनसामान्यांमध्ये बदनामी करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून उरणमधील भाजपचे उमेदवार महेश बालदी व पेणचे उमेदवारी रविशेठ पाटील यांनी हे केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करुन सखोल चौकशी करण्याची मागणी कार्यालयीन चिटणीस ॲड. राजू कोरडे यांनी केली आहे. याबाबत शेकापच्यावतीने महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी, पेण व उरणचे निवडणूक अधिकारी, अलिबागचे सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व उरणचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.