। ठाणे । प्रतिनिधी ।
नववर्ष स्वागत आणि थर्टी फर्स्टची सर्वत्र धूम पसरली असतानाचा ठाण्यात नकली दारूचा पूर आला असून त्यात परदेशी, बनावट आणि बिना शुल्क दारूची विक्री केल्याचे उघड झाले आहे. या बनावट दारूचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत डिसेंबर महिन्यात तब्बल 2 कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. याप्रकरणी 395 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
थर्टी फर्स्टच्या पाश्वभूमीवर दारूच्या बेकायदा वाहतुकीसह अमली पदार्थ उत्पादन, विक्री करणे, बाळगणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 395 गुन्हे दाखल करत 2 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, कमी शुल्काची परदेशी दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी तीन मोठे गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून 67 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याशिवाय राज्य उत्पादन विभागाने चार फ्लाईंग स्कोडची नियुक्ती केली आहे. या स्कॉडने 14 विभागीय निरीक्षकांच्या मदतीने हातभट्टी, बेकायदेशीर ढाबे, हॉटेल आणि मद्यनिर्मितीच्या ठिकाणांवर कारवाई करून आतापर्यंत 2 हजार 592 गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्याकडून 11 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आयुर्वेदिक औषधाच्या नावाने भांगेच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. या गोळ्या पान टपर्या, लहान किराणामालाची दुकाने, काही औषधांची दुकाने आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या बेकायदेशीर भांगेच्या गोळ्यांची विक्री व साठा केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.