दोन आरोपी ठाणे शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद
| पनवेल | वार्ताहर |
ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड येथे 2000 रुपयांच्या चलनी दराच्या आठ कोटी रूपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना ठाणे शहर गुन्हे शाखा, घटक 5 कडून जेरबंद करण्यात आले आहे.
ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड येथे दोन इसम इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीलायक बातमी गुन्हे शाखा, घटक 5 चे व.पो.नि. विकास घोडके यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून आरोपी राम हरी शर्मा (52), राजेद्र रघुनाथ राऊत (58) यांना इनोव्हा गाडी क्र. एम.एच 04 डीबी 5411 सह शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती केली असता रु. 2,000/- दराच्या वेगवेगळ्या नंबरच्या नोटा असलेले 400 बंडल एकूण आठ कोटी किमतीच्या बनावट भारतीय चलनी नोटा सापडून आल्या. याबाबत आरोपींकडे अधिक चौकशी केली असता सदरच्या बनावट नोटा आरोपींनी मदन चौव्हाण याच्या मदतीने पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाळ्यामध्ये संगणक व प्रिन्टरच्या सहाय्याने छापुन त्या बनावट नोटा विक्री करण्याकरीता आले असल्याचे सांगितले.