बारवर बनावट छापा मारणारे अटकेत

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
लाचलुचपत विरोधी विभागाचे पोलिस असल्याचे सांगून राजमहाल सर्व्हिस बारवर छापा मारून बारचालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला नेरूळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. संजय शंकर निराळे (वय 47), सागर संजय नलावडे (वय 32), ज्योती प्रमोद पांचाळ (वय 34), हर्षला जोसेफ जॉन (वय 34), दिव्या बाबुराज नायर (वय 30) आणि वैशाली संदीप पाटील (वय 33) अशी आरोपींची नावे आहेत.

नेरूळमधील राजमहाल सर्व्हिस या लेडीज बारमालकाकडून पैसे उकळण्यासाठी गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास या बारवर छापा मारण्यात आला होता. चार जणांनी गळ्यात लाचलुचपत विरोधी विभागाचे ओळखपत्र घातले होते. तर इतर दोघांच्या गळ्यात पत्रकार असल्याचे ओळखपत्र होते. या टोळीने बारमधील सर्व ग्राहकांना बाहेर काढून बारमधील महिला वेटर्ससोबत धक्काबुक्की करून त्यांना किचनमध्ये बंद केले होते.

यावेळी बारचालकाने बारवर छापा मारल्याची माहिती बारमालक प्रदीप शेट्टी याला दिल्यानंतर त्याने आपल्या ओळखीतील काही पोलिसांकडे यासंदर्भात चौकशी केली असता लाचलुचपत अशाप्रकारे छापा मारत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शेट्टी याने नेरूळ पोलिसांत या बोगस छाप्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बारमध्ये धाव घेत सर्वांना अटक केली. पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांवर खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. या सर्वांना नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version