। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये एका इमारतीचा पुनर्वसन प्रकल्प पुढे रेटण्यासाठी मृत (दिवंगत) सभासदाच्या खोट्या स्वाक्षर्या केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी नव्हे वेळोवेळी सभा, अजेंडे, निर्णय यावर मयत अब्दुस तुंगेकर यांच्या स्वाक्षर्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांच्या वडिलांची प्लॉट क्रमांक 278/4 मुल्ला अब्दुल हमीद मार्ग येथे जागा होती. 1994 साली या ठिकाणी गुलशन नावाची इमारत उभारण्यात आली. या इमारतीमध्ये 12 सदनिका, तर सहा व्यावसायिक स्वरूपाचे गाळे बांधण्यात आले आहेत. पैकी दोन सदनिका आपल्यापाशी ठेवून त्यांच्या वडिलांनी बाकीची मालमत्ता विक्री केली. 1997 मध्ये त्यांच्या वडिलांनी नगरपरिषदेची रीतसर परवानगी घेऊन इमारतीमध्ये सातव्या गाळ्याची निर्मिती केली. 2007 मध्ये 309 क्रमांकाची सदनिका तक्रारदार यांच्या चुलत भाऊ झैद नूर मुल्ला याला बक्षीस पत्राद्वारे देण्यात आली. 2008 साली नगरपरिषदेच्या रीतसर परवानगीने मुल्ला कुटुंबियांनी सातव्या गाळ्यांमध्ये मेझनिन फ्लोअर बांधला. त्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजे 2010 साली गुलशन इमारतीमधील रहिवाशांनी गुलशन सोसायटी फॉर्म केली. नोंदणीकृत दस्त नसल्याचा ठपका ठेवत सोसायटीने मुल्ला कुटुंबियांना सदनिका क्रमांक 104 आणि गाळा क्रमांक सात यांना सोसायटीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला. असे असले तरीदेखील सर्व सदस्यांप्रमाणेच या दोन मिळकतीचा मेंटेनन्स मात्र सोसायटी नित्यनेमाने घेत होती. कालांतराने तक्रारदार यांच्या वडिलांनी गाळा क्रमांक सात हा बक्षीस पत्राद्वारे रमीझ मुल्ला आणि आदिम मुल्ला यांच्या नावे केला.
मार्च 21 मध्ये मुल्ला बंधूंना सोसायटीच्या पुनर्निर्माण विषयाबाबत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले. या बैठकीत पुनर्निर्माणासाठी विकासक म्हणून मंगेश परुळेकर यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. ही बैठक सहाय्यक निबंधक यांच्या उपस्थितीत पार पडली. आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी यापूर्वी पुनर्निर्माणविषयक कुठलाही पत्रव्यवहार सोसायटीकडून मिळाला नसल्याचे ठणकावून सांगितले. तसेच अंतिम स्तरापर्यंत गोष्टी आल्या असूनसुद्धा कित्येक रहिवाशांना अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे सदरच्या पुनर्निर्माण प्रक्रियेला विरोध दर्शवून त्यांनी बैठक सोडली, असे मुल्ला यांचे म्हणणे आहे.
पुनर्निर्माण करायचेच असा चंग बांधून सोसायटीच्या पदाधिकार्यांनी पनवेल महानगरपालिकेतील अधिकार्यांसमवेत नियमबाह्य पद्धतीने दस्तावेज निर्माण केले. तक्रारदार आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांच्यादेखील खोट्या स्वाक्षर्या केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, 14.01.2020 रोजी मृत झालेल्या अब्दुस सालाम तुंगेकर या सोसायटीमधील सदस्याच्या मृत्यूपश्चात बैठका, अजेंडे आदी दस्तावेज तयार तयार करताना खोट्या स्वाक्षर्या केलेल्या आढळून आल्या. सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातून पुनर्निर्माणबाबत कागदपत्रांची प्रत मागवली असता हा सारा खोटेपणा उघड झाला, असा मुल्ला यांचा दावा आहे.
असे असूनदेखील धोकादायक इमारत असल्याचे प्रमाणपत्र पुढे करत पुनर्निर्माण प्रकल्प पुढे रेटण्यात आला. आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी न्यायालयात धाव घेतली. दिवाणी स्तर न्यायालयाने या इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश पारित केले आहेत. झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींवर तक्रार केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. उच्च न्यायालयातील उन्हाळी सुट्टी विशेष कोर्टानेदेखील दिवाणी न्यायालयाच्या बांधकाम थांबविण्याच्या निर्णयास दुजोरा दिला आहे.
या पुनर्विकास प्रक्रियेसाठी निविदा मागवायचा कालखंड संपल्यानंतर सुमारे महिनाभर उशिराने विकासकाने निविदा दाखल केल्याचेदेखील उघड झाले आहे. याच मुद्द्यावर तक्रारदार रमिझ मुल्ला आणि आदिम मुल्ला हे सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील करणार आहेत.