वडिलांचा घातपाताचा संशय
| नेरळ | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील एका विवाहितेच्या मृत्यूने गूढ स्वरूप धारण केले असून, तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्योत्स्ना पारटे (35) यांच्या मृत्यूबाबत आत्महत्येची नोंद झाली असली तरी हा प्रकार संशयास्पद असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील भूतिवली येथील सुहास काशीनाथ पवार यांची मुलगी ज्योत्स्ना यांचा विवाह 2013 मध्ये खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील संतोष रामदास पारटे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर 2015 आणि 2017 मध्ये त्यांना दोन मुली झाल्या. मात्र, मुलगा नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून ज्योत्स्ना यांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे.
ज्योत्स्ना यांचा पतीही त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सांगण्यात आले असून, या त्रासाला कंटाळून त्या काही काळ खरसुंडी येथे एकट्याच राहत होत्या. दरम्यान, 1 एप्रिल 2026 रोजी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली. त्यांना खोपोली येथील मोहिते रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मात्र, मृतदेहाची पाहणी करताना कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळून न आल्याने तसेच गळफास घेतल्याचे स्पष्ट चिन्ह दिसून न आल्याने कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते, त्या ठिकाणी असलेल्या छतावरील पंख्याची केवळ एक पात वाकलेली आढळून आली. ज्योत्स्ना यांच्या वजनाच्या तुलनेत पंखा कोसळणे अपेक्षित होते, असेही कुटुंबियांचे म्हणणे आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता, हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असू शकतो, असा गंभीर आरोप वडील सुहास पवार यांनी खालापूर पोलिसांकडे तक्रार देताना केला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, ज्योत्स्ना पारटे यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सत्य बाहेर यावे यासाठी कुटुंबीय आणि नागरिक प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत.
