अलिबाग शहरात कौटुंबिक कलह वाढतोय

Separation Of Family Figure Cut Out In Front Of Judge Gavel

कौटुंबिक न्यायालयात 50 प्रकरणे; 4 निकाली
। अलिवाग । वर्षा मेहता ।
कौटुंबिक अडचणी सोडवण्यासाठी न्यायालयात धाव घेणार्‍यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या तीन महिन्यापूर्वी सुरु झालेल्या अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयात 50 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 45 प्रकरणे अलिबाग दिवाणी न्यायधीश वरिष्ठस्तर यांच्याकडून वर्ग करण्यात आली आहेत. तर 5 प्रकरणे कौटुंबिक न्यायालय सुरु झाल्यानंतर दाखल करण्यात आली आहेत. तर 4 प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे,अशी माहिती अलिबाग कौटुंबिक न्यायालय प्रबंधकांनी दिली आहे.

महिलांना त्यांचे हक्क मिळावेत,कौटुंबिक समस्या योग्य मार्गाने सोडवल्या जाव्यात, या हेतूने अलिबागमध्ये 4 मे रोजी कौटुंबिक न्यायालय उभारण्यात आले. त्याला तीन महिने पूर्ण झाले. पती-पत्नीमधील वादानंतर न्यायालयात पोहचलेल्या उभयतांना प्रथम एकत्र आणण्याचा प्रयत्न कौटुंबिक न्यायालयामार्फत केला जातो. कोणत्याही कुटूंबांचा पाया हा पती-पत्नीच्या नात्यावर भक्कमपणे उभा असतो. हेच नाते काही प्रसंगी किरकोळ कारणावरून डळमळीत होते. यातून टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. वाढत्या लोकसंख्येसोबतच पती-पत्नीच्या वादासंबंधी प्रकरणे कौटुंबिक न्यायालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दाखल झालेली प्रकरणे
श्रेणी ए- हिंदु विवाह याचिका- 23
श्रेणी डी- पालकत्व कायदा- 1
श्रेणी इ- पोटगी संबंधीत – 16
श्रेणी एफ- परस्पर संमतीबाबत- 3
श्रेणी इ आर- सेक्शन 125 (3) रिकव्हरी अ‍ॅप्लिकेशन संबंधीत -7

अधिकार क्षेत्रात वाढ
अलिबाग कौटूंबिक न्यायालयाचे अधिकार क्षेत्र अलिबाग नगरपरिषद हद्दीपुरतेच मर्यादीत होते. याबाबत अलिबाग कौटूंबिक न्यायालयाने अधिकार क्षेत्र वाढवुन मिळण्याची मागणी केली होती. त्या माग़णीला मान्यता मिळाली असून आता अलिबाग कौटूंबिक न्यायालयाचे क्षेत्र अलिबाग तालुक्यापुरते मर्यादीत झाले आहे.

या प्रकरणांचा समावेश
घटस्फोट, विवाह रद्द करणे,कायदेशीर विभक्तपणा, नांदायला जाणे, वैवाहिक संबंधातून निर्माण झालेल्या संपत्ती बाबतचे प्रतिबंधात्मक दावे, पत्नी, मुले यांच्या पोटगी, पालन पोषणा बाबबतचे दिवाणी दावे, पोटगी वसूली दावे, वाढीव पोटगी किंवा इतर किरकोळ वैवाहिक वादासंबंधीची प्रकरणे या न्यायालयात चालवली जातात.

समुपदेशनाचा आधार
सध्या फ्लॅट संस्कृतीबरोबर विभक्त कुटुंबांची संख्या वाढतेय. वाढत्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी धावपळ, एकमेकांशी कमी झालेला संवाद, माझे निर्णय मीच घेणार म्हणून असलेला हेका… अशा एक ना अनेक कारणांमुळे कुटुंब तुटत चालली आहेत. घरात समजावून सांगणारे मोठे लोक नसल्यामुळे जगण्याचा आधार हरवत चालला आहे. अशा तुटत चाललेल्या कुटुंबांना आधार मिळतोय तो समुपदेशनाचा.

Exit mobile version