| रायगड | प्रतिनिधी |
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात जिल्हाभरात ठिकठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 18 हजार 42 घरगुती, तर 169 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिसांकडून विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गेले दहा दिवस बाप्पाच्या आगमनाने वातावरण चांगलेच भक्तीमय झाले होते. विविध सार्वजनिक मंडळांनी राष्ट्रहिताचे तसेच देशप्रेम जागवणारे देखावे उभे केले केले होते. भजन, कीर्तनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची दहा दिवस चांगलीच रेलचेल होती. सकाळ-संध्याकाळी घराघरातून आरतीच मंजूळ सूर कानी पडत होते. एक वेगळा उत्साह अंगी संचारला होता. परंतु, विसर्जनाच्या दिवशी सर्वच भक्तांच्या डोळे पाणावलेले दिसत होते. अलिबाग समुद्रकिनारी नगरपालिकेकडून विसर्जनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश, मदत केंद्र उभारुन गणेशभक्तांना मदत करण्यात येत होती. दुपारी चारनंतर जिल्हाभर सर्वत्र विसर्जन मिरणुका काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा पार पडला. तलाव, नदी-नाले, समुद्रकिनारी बाप्पाच्या विसर्जनाची ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या माध्यमातून चोख व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनघाटाचा परिसर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी बाप्पाला आर्त साद घालण्यात येत होती. त्यामुळे सारा परिसर भारावून गेला होता.







