पाली/बेणसे | प्रतिनिधी |
गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात पाच दिवसाच्या गणरायाला पाली सुधागडात निरोप देण्यात आला. यावर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून विसर्जन स्थळी होणारी पूजा घरीच करण्यात आली. अनेकांनी श्रीची मूर्ती , शाडू व पर्यावरणपूरक घेणे पसंत केले. व अशा मूर्तींचे विसर्जन ही घरीच करणे पसंत केले. सामाजिक , विधायक उपक्रमा बरोबर अनेकांनी पर्यावरण पूरक व प्रबोधनात्मक दृष्ट्या गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्यात काही ठिकाणी कृत्रिम तलावांची देखील निर्मिती करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी नद्या , तलाव व समुद्रात गणेशविसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्वत्रच पाच दिवसाच्या गौरी गणपतीला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर नियमांच्या चौकटीत राहून उत्साही वातावरणात गणेशभक्तांनी सण साजरा करण्यास प्राधान्य दिले.
दरम्यान गणेशोत्सवादरम्यान कुठेही अनुचीत प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेत पाली पोलीसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. सुधागड तालुक्यातील अनेक गणेशमुर्तींचे विसर्जन गावाच्या जवळील नदी व तलावात करण्यात आले. यावेळी विसर्जनस्थळी लहानथोरांनी भक्तिभावाने सहभाग दर्शविला होता.