संगीतमय ‘कीर्ती’ला निरोप

स्वाती पेशवे    

जयराम आणि जयमाला शिलेदार यांच्या पोटी जन्म घेतलेल्या कीर्तीनं आईवडिलांचा समृद्ध वारसा नेटानं पुढे नेला आणि या संपूर्ण कुटुंबानेच मराठी संगीत रंगभूमीच्या कामी स्वत:ला वाहून घेतलं. कीर्ती शिलेदार हे संगीत रंगभूमी गाजवणारं आणि गंधर्वांची गायकी जिवंत ठेवणारं एक अग्रणी नाव ठरलं. अशी अमाप कीर्ती मिळवलेल्या कीर्तीताईंबद्दल ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे आणि ज्येष्ठ गायिक फैय्याज मनमोकळं बोलतात…

संगीत रंगभूमीवरील एक ख्यातनाम गायिका आणि मनस्वी कलाकार अशी ओळख असणार्‍या कीर्ती शिलेदार यांचं निधन ही पचवण्यास अत्यंत कठीण अशी बातमी आहे. संगीत रंगदेवतेची भक्ती करणार्‍या कीर्तीताईंनी माता-पित्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आणि अत्यंत श्रद्धेनं संगीत नाटकांसाठी आयुष्य झोकून दिलं. त्यांचं या क्षेत्रातील योगदान अमूल्य आणि अफाट आहे.
ज्येष्ठ गायक पं.अजित कडकडे त्यांच्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘कीर्तीताईंबरोबर खूप काम करण्याचा, त्यांच्याबरोबर खूप गाण्याचा फारसा योग आला नसला तरी मी नेहमीच त्यांच्या गाण्याचा प्रशंसक राहिलो आहे. बर्‍याच दिवसांंपूर्वी आम्ही एक रोडिओ प्रोग्राम केला होता. त्यात कीर्ती, मी आणि दोन कन्नड कलाकार अशा सगळ्यांनी मिळून हैद्राबाद, विजयवाडा आदी भागातल्या पाच ठिकाणी  कार्यक्रम केले होते. मुंबईहून आमचा हा दौरा सुरू झाला होता. त्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कीर्तीबरोबर गाण्याची संधी मिळाली. मला तिचं गाणं खूप आवडायचं. गाण्याबरोबरच तिचा अभिनयही विलक्षण देखणा होता. स्टेजवर उभं राहिल्यावर  गाण्याबरोबरच तिचा मुद्राभिनयही अतिशय प्रभाव ठेवून जात असे. तिची ‘स्वयंवर’मधली भूमिका आठवा. ती कृष्णाला उद्देशून गाणं म्हणायची तेव्हा गाण्याबरोबरच तिचा मुद्राभिनय, डोळ्यांमधून व्यक्त होणार्‍या भावना हे केवळ बघत रहावं असं असायचं. मुळात तिचे डोळे मोठे आणि अतिशय बोलके होते. मुख्य म्हणजे अभिनयात ती त्या पाणीदार डोळ्यांचा नेमका वापर करायची. ती एक चतुरस्त्र कलाकार होती.’
आठवणीत रमलेले पं. अजित कडकडे पुढे सांगतात,‘ ‘स्वरसम्राज्ञी’ मधली तिची भूमिका मला खूप आवडली होती. त्याला निळकंठ अभ्यंकरांनी दिलेलं संगीतही विलक्षण होतं. त्यात कीर्तीताई खूप छान गायची. ते गायन अजूनही कानात आहे. मुळात प्रथमपासून तिच्यावर संगीताचे संस्कार होते. आई-वडिलांचं गाणं ऐकतंच ती मोठी झाली होती. पण असं असलं तरी तिचं गाणं त्याच पठडीत न राहता वैविध्यानं भरलेलं होतं. तिचं गाणं ऐकताना हे वेगळेपण प्रकर्षानं जाणवायचं. आई-वडिलांचा  वारसा असूनही तिने स्वत:ला वेगळ्या अंगानं विकसित केलेलं स्पष्ट दिसत असे. मैफिलीपेक्षाही ती रंगमंचावर उभं राहून गायची तेव्हा तिचं गाणं अधिक फुलायचं असं मला वाटतं. मैफिलीतील गाण्याच्या सादरीकरणाला काही मर्यादा असतात. बसून गाताना गायक मुद्राभिनय एका मर्यादेपेक्षा अधिक करु शकत नाही. तसा प्रयत्न केला तर ते विचित्र दिसतं. उदाहरणार्थ बाजूला रुक्मिणी उभी असताना मी नाटकामध्ये कृष्णाच्या भूमिकेतील ‘प्रिये पहा…’ गायचो तसाच शेजारी सहकलाकार नसताना बसून एखाद्या मैफिलीत गायलो तर कसं वाटेल? नेमकी हीच मर्यादा कीर्तीताईच्या मैफिलीतल्या गाण्यात मला सतत जाणवायची. मात्र रंगभूमीवर उभं राहिल्यानंतर गाताना जणू तिचं सर्वांगं अभिनय करायचं. तिचे हातवारेही काहीतरी सांगत असायचे. इतकंच कशाला, रंगमंचावर तिची उभी राहण्याची, पाय ठेवण्याची लकबही अत्यंत समर्पक आणि तिच्या भूमिकेची उंची वाढवणारी असायची.’
कीर्तीताईच्या अभिनयातले बारकावे आणखी नेमकेपणाने उलगडून सांगताना पं. अजित कडकडे सांगतात, ‘नऊवारी नेसल्यानंतर पाय ठेवण्याची पद्धत वेगळी असते. पण ती सहावारी साडी नेसल्यावर असते तशी ठेवली तर दिसायला अत्यंत विचित्र दिसतं. कीर्तीताई हा फरक नेमका ओळखायची आणि नऊवारीचा तो पारंपारिक बाज आणि आब आपल्या हालचालीतून, उभं राहण्याच्या शैलीतून नेमकेपणानं जपायची. खरं सांगायचं तर नऊवारी नेसल्यावर पाय कसे ठेवायचे, कसं चालायचं हे कोणी तिच्याकडे बघून शिकावं. तिचं ‘स्वयंवर’ पाहिलेल्या दर्शकांना मी काय म्हणतो हे नक्की समजेल. ‘स्वयंवर’ हे तिचं नाटक मी कमीतकमी दहा वेळा तरी बघितलं. ‘शिवाजी मंदिर’ वा ‘दीनानाथ’ला मागच्या खुर्चीवर बसून मी ते नाटक बघायचो. कधी कीर्तीताईला भेटून यायचो तर कधी न भेटताच परतायचो. पण पहायचो त्या प्रत्येकवेळी तिच्या गायनाला मी भरभरुन दाद दिलेली असायची. आधी उल्लेख केलेल्या दौर्‍यावर गेलो असताना ती एक कानडी गाणं गायल्याचं मला अजूनही आठवतं. तिचं ते कानडी गाणं ऐकून तिथले प्रेक्षक प्रचंड खूश व्हायचे. तिचे कानडी उच्चार, तो ठराविक हेल तंतोतंत उतरायचा. म्हणूनच आपण तिला ‘चतुरस्त्र कलाकार’ असं म्हणू शकतो. दुर्दैवानं तिच्याबरोबर फार काम करण्याचा योग आला नाही. एकदा तिच्याबरोबर काम करण्यासाठी कोणीतरी विचारणा केली होती, पण तेव्हा मी नाटक सोडलं होतं. त्यामुळे ती संधी हुकली. असं असली तरी कीर्तीताई ही माझी आवडती कलाकार होती. आज ती आपल्याला सोडून  गेली आहे. पण तिचं गाणं नेहमीच आपल्याबरोबर राहील यात शंका नाही.’
कीर्ती शिलेदार यांच्याबद्दल बोलताना ज्येष्ठ गायिका फैय्याजही भावूक होतात. त्यांच्या आठवणीत हरवलेल्या फैय्याजजी सांगतात, ‘कीर्तीच्या निधनाची अचानक आलेली बातमी चक्रावून टाकणारी आहे. ती माझ्यापेक्षा वयाने लहान. काही वर्षांपूर्वी भेट झाली तेव्हा तिची तब्येत ठीक नसल्याचं कळलं होतं. मात्र त्या आजारातून ती सावरलीही होती. मात्र अचानक आलेली ही बातमी खूपच दुखद आहे. सध्या सह्याद्री वाहिनीवर तिनं दिग्दर्शित केलेलं ‘स्वरसम्राज्ञी’ हे नाटक सुरू आहे. ते मी बघते आणि त्यानिमित्ताने तिची आठवणही येते. आधी ती या नाटकात काम करायची. पण आता आपल्या क्लासेसमधल्या मुलांना घेऊन तिनं ते पुन्हा बसवलं होतं. चारुदत्त आफळे आणि अन्य काही सहकलाकारांनी ते रंगवलं आहे.  तिचा प्रवास असा अचानक संपणं अत्यंत धक्कादायक आहे.’
फैय्याजजी पुढे म्हणतात,‘जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांचं मराठी रंगभूमीवरील योगदान खूप मोठं आहे. त्यांची सगळी संगीत नाटकं रसिकांच्या मनात उतरली. संगीत नाटकाला, स्वरांना समर्पित करणारं हे जोडपं होतं. त्यांची ही कन्यादेखील त्याच वाटेवरुन पुढे चालली आणि तिनंही संगीत नाटकाला वाहून घेतलं. आम्ही तरी गरज म्हणून संगीत नाटकांबरोबरच  विनोदी, ऐतिहासिक नाटकांमध्येही कामं केली. पण या संपूर्ण परिवारानं संगीत नाटकाखेरीज अन्य कुठेही काम केलं नाही हे महत्त्वाचं. बालगंधर्वाच्या पठडीतली नाटकं ही त्यांची प्रमुख ओळख बनली. जयमालाबाईंचा समृद्ध वारसा घेऊन, त्याच पठडीतून कीर्ती आली आणि परिवाराचा हा नावलौकिक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.  ‘संशयकल्लोळ’पासून ‘स्वयंवर’पर्यंतचा आलेख पाहिला तर तिने गाठलेली उंची समजण्यास फार वेळ लागणार नाही. तिनं केलं तसं ‘स्वयंकर’ दुसर्‍या कोणालाही करता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे.
फैय्याजजी सांगतात, ‘कीर्ती मुलुंडच्या नाट्यसंमेलनाची अध्यक्ष झाली तेव्हा मी खास तिच्यासाठी संमेलनाला उपस्थित राहिले होते. ते संमेलन अत्यंत दिमाखात पार पडलं होतं आणि त्यातील कीर्तीचं अध्यक्षीय भाषणही खूप गाजलं होतं. संगीत नाटकांवर, त्याच्या आत्तापर्यंत प्रवासावर आणि सद्यस्थितीबद्दल तिने मार्मिक टिपण्णी केली होती. त्याचवेळी ती आपल्या मात्या-पित्यांबद्दलही भावपूर्ण बोलून गेली होती. वर्तपानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली त्या वेळची कात्रणं आजही वाचकांना आठवत असतील. कीर्तीमध्ये संगीत रंगभूमीला देण्यासाठी आणखी खूप काही होतं. पण शारीरिक असहकारापुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं. तिला बरं नसल्याचं समजल्यावर मी फोनवर तिची विचारपूस केली होती. तेव्हा ती मिश्कीलपणे म्हणाली होती, ‘मी आयुष्यभर अंड्याला हातही लावला नाही, पण आता रोज मला अंडी खावू लागतात…’ यावर आम्ही मनमोकळ्या हसलो होतो आणि ‘आता हाय प्रोटिनयुक्त आहार असायलाच हवा’, अशी टिपण्णीही मी केली होती. मध्यंतरी नागपुरालाही आमची प्रत्यक्ष गाठ पडली होती.  आम्ही एकत्र काम केलं नसलं तरी कलाकार म्हणून नेहमीच एकमेकींप्रती मनात प्रेम आणि आपुलकी होती. भेटायचो तेव्हा आमच्या छान गप्पा व्हायच्या. हातात हात घालून एकमेकींची विचारपूस करायचो. आता पुन्हा ते सुख अनुभवता येणार नाही. कीर्ती आपला निरोप घेऊन निघून गेली आहे. पण तिच्या आठवणी नेहमीच आपल्याबरोबर असतील. तिला विनम्र आदरांजली.’

Exit mobile version