निवडणुकीच्या हंगामात शेतमजूर मिळेनात

बळीराजाची चिंता वाढली
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. गावातील निवडणूक असल्याने त्यामध्ये बहुतांश नागरिक सहभागी होत असतात. मात्र या निवडणूकीचा फटका शेतीला बसत आहे. भात कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

पाऊस बऱ्यापैकी झाल्याने शेतामध्ये पिक डोलाने उभे राहीले आहे. सध्या भात कापणीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. दरवर्षी गावातील तसेच दूर्गमभागातील मजूर शेतीच्या कामांसाठी उपलब्ध होतात. परंतु सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांमुळे गावातील वातावरणात चांगलीच रंगत आली आहे.

निवडणूका तसा महत्वाचा विषय असल्याने गावातील नागरिकांचा त्यामध्ये कमीअधिक प्रमाणात सहभाग असतो. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सध्या निवडणूकांचा विषय चघळला जात आहे. विविध राजकीय पक्षांकडून मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत खाणे-पिण्याची सोय केलेली असते. दररोज पार्ट्यांचे आयोजन केलेले असते. त्यामुळे चांगलीच सोय झालेली असल्याने अशा ठिकाणी सध्या गर्दी दिसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. बाहेरुन कामासाठी येणारे मजूर हे देखील त्यांच्या गावात निवडणूक असल्याचे कारण देत आहेत. त्यामुळे शेतीची कामे करताना बळीराजाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षापासून शेतीच्या मजूरीचे दर हे शेतकऱ्यांना परवडत नाहीत, तरी देखील तो भुर्दंड सहन करत शेतीचा व्यवसाय केला जात आहे. जास्तीची मजूरी देत असतानाही काही शेत मजूर हे कामासाठी येण्यास टाळाटाळ करत आहेत, असे शेतकऱ्याने सांगितले. भातकापणी वेळेवर झाली नाही, तर शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. काही भागात मजुरांची उपलब्धता नसल्याने घरातील व्यक्ती स्वतः शेतात राबत असल्याचे दिसून येते.

Exit mobile version