शेतकऱ्यांना समजली शेतीची नवी तांत्रिक पद्धत
| पाली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तसेच पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाली येथील भक्त निवास हॉलमध्ये हे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी केले. पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यासाठी रोशनी जाधव, प्रिया गमरे व त्यांच्या सहकारी निकिता मोकल उपस्थित होत्या. शाश्वत शेती, पाणी बचत तंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी व्यवस्थापनाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत कृषी विभागाने शेतकऱ्यांना नव्या तांत्रिक पद्धतींची ओळख करून दिली. प्रशिक्षण सत्रादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवला. 100 हून अधिक शेतकरी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. मृदा परीक्षण, सेंद्रिय शेती पद्धती, हवामानानुसार पीक व्यवस्थापन, विविध पिकांच्या सुधारित तंत्रांचा अवलंब, पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन व कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचे उपाय याचाबत सविस्तर माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्याचे अनुभव मांडले.
सहभाग वाढीचा उद्देश कार्यक्रमात फार्मर कप 2025-26 या उपक्रमाची विस्तृत माहिती देण्यात आली. या स्पर्धेद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतशील शेतीत सहभाग वाढावा आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मारुती आढाव (उप कृषी अधिकारी) यांनी केले. या प्रशिक्षणास मंडळ कृषी अधिकारी परळी सुखदेव कोळपे, कृषी अधिकारी वैशाली कोळपे व तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी पाली उदय भोसले यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र महाविस्तार ए आय ॲप नोंदणी व वापराबाबत मार्गदर्शन केले व कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
प्रशिक्षणाची आवश्यकता
शाश्वत कृषी विकासासाठी अशा प्रशिक्षणांची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने व्यक्त केले. शेतकऱ्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात अशा उपयुक्त प्रशिक्षणाचे प्रमाण वाढवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
