ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
। पाली । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायत हद्दीतील धोंडसेगाव फाटा ते श्री कानिफनाथ मंदिर व वाकणगाव आदिवासी वाडीकडे जाणारा सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता येथील शेतकरी संतोष गोपाल खंडागळे यांनी सोमवारी (दि.25) जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे उखडून नादुरुस्त केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापचे लाट उसळली असून या घटनेचे विरोधात येथील ग्रामस्थांनी पाली तहसीलदार, पाली पोलीस ठाणे आणि गटविकास अधिकारी यांना शुक्रवारी (दि.29) निवेदन दिले.
यावेळी सरपंच श्याम खंडागले, रिपाइचे तालुकाध्यक्ष भगवान शिंदे, सेनेचे वाहतूक सेना प्रमुख शरद फोंडे, संदेश जाधव, महेश जाधव, अविनाश खडागळे, नरेश खडागळे, सखाराम खंडागळे, आदि ग्रामस्थ उपस्थित होते. या निवेदनातून त्यांनी म्हटले आहे की, या रस्त्यावर सन 2012-13 यावर्षी दळणवळणाची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने सरकारी योजना डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत फंड टाकून या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर हा वाहतुकीचा रस्ता या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक नादुरुस्त केल्याने नागरिकांना तसेच आदिवासी वाढीतील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तरी संबंधित अधिकारी वर्गाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करावा. तसेच, संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
