केंद्र, राज्य सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

शेकापच्या वतीने बीड, सांगोल्यात आंदोलन
गडचिरोली प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडवलधार्जिण्या धोरणाला कडाडून विरोध करीत राज्यभर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बीड, सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाने सहभागी होत सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यानिमित्त शेतकरी वाचवा, लोकशाही वाचवा दिन पाळण्यात आला.

अखिल भारतीय किसान समन्वय समितीतर्फे मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या किसान आंदोलनाची राष्ट्रपतींनी दखल घ्यावी व शेतकरी विरोधी तीन आणि कामगार विरोधी चार कायदे तात्काळ मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि आयटक यांनी सहभागी होत आंदोलन केले.

भाकपच्या किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. डॉ. महेश कोपूलवार, शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, आयटकचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड. जगदीश मेश्राम, रमेश उप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात शेती वाचवा-लोकशाही वाचवा, किसान विरोधी कायदे रद्द करणे, एमएसपीची कायदेशीर हमी देणे, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करणे या प्रमुख मागण्यांसह खते, औषधे, बी-बियाणे यांच्या किंमती अनुदानित दरात देण्यात यावे. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करुन प्रचंड वाढलेली महागाई कमी करण्यात यावी. कामगारांच्या हिताचे पूर्वीचे कायदे कायम ठेवावे व सरकारने लादलेले 4 कामगार संहिता रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. चंद्रभान मेश्राम, कॉ. प्रकाश खोब्रागडे, नगरसेविका शिंधूबाई कापकर, संजय वाकडे, केवळराम नागोसे, विशाल दाम्पलीवार, अमोल दामले, मारोतराव आमले, तुलाराम नेवारे, रामभाऊ काळबांडे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री वेळदा, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर, विलास अडेंगवार, विजया मेश्राम, शिल्पा लटारे, पुष्पा कोतवालीवाले, श्रीधर मेश्राम, गणेश आडेकर यांच्यासह आयटक आशा गटप्रवर्तक हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version