सिडकोविरोधात शेतकरी आक्रमक

साडेबारा टक्के भूखंड देण्यास टाळाटाळ
10 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा
| उरण | वार्ताहर |
गेल्या अनेक वर्षांपासून जासई येथील बाधित शेतकऱ्यांना भूखंड देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त शेतकरी येत्या दि. 10 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उरण तालुक्यातील जासई परिसरातील 37 शेतकऱ्यांची जमीन उरण-नेरुळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र, संपादित शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षांपासून साडेबारा टक्के देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याच्या निषेधार्थ बाधित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सिडको प्रशासनाला एक महिन्यात साडेबारा टक्के भूखंड दिले नाहीतर रेल्वेचे काम बंद करण्याचा अल्टिमेटम दिला होता.

गेल्या 22 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही सिडकोने प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. सिडको प्रशासन सांगते, आमच्याकडे तुम्हाला जागा देण्यास नसल्याचे सांगतात, मग साडेबावीस टक्के देण्यास जागा कशी आहे, असा सवालही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. आमच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड येत्या महिन्याभरात न दिल्यास रेल्वे आणि सिडकोविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, अशी माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत व प्रकल्पग्रस्तांनी दिला होता.

गेंड्याच्या कातडीचे सिडको प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने येत्या दि. 10 ते 14 ऑक्टोबरपर्यंत रेल्वे स्टेशन गव्हाण येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित जासई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Exit mobile version