गेलविरोधात शेतकरी आक्रमक

उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण


| पेण | प्रतिनिधी |

गेल कंपनीच्या पाईपलाईनविरोधात 24 गाव शेतकरी संयुक्त कृती समितीने उपविभागीय अधिकारी पेण यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. भूसंपादनामुळे येथील शेतकरी भूमिहीन होण्याची भीती असल्याने त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. शासन कवडीमोल भावाने जमिनी घेऊ पाहात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या उपोषणासाठी पेण तालुक्यातील रावे, डावरे, जोडे, कळवे, कणे, बोर्झे, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद या गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले की, भूसंपादन विरोधाचे पत्र आम्ही संबंधित कंपनीला व शासनाला यापूर्वी दिले आहे. सदरील जमीन संपादित करण्यात येणाऱ्यांमध्ये अनेक शेतकरी हे अल्पभूधारक असून, ते नंतर भूमिहीन होणार आहेत. तसेच सदरील गावे ज्या क्षेत्रात समाविष्ट आहेत, त्या जमिनींची किंमत ही भविष्यात करोडो रूपयांची असून, आता शासन कवडीमोल किमतीला घेऊ पाहात आहे.

अनेक पिढ्यांनी राखून ठेवलेली जमीन सरकारने घेतल्यास आम्हाला व आमच्या कुटुंबियांना घरे बांधणे, व्यवसाय करणे यास मुकावे लागणार आहे. आम्हाला आमचा गाव सोडून परक्यासारखे इतरत्र विस्थापित व्हायला लागणार आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचा सदरील पाईपलाईनच्या भूसंपादनाला विरोध आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. या उपोषणास आजी-माजी आमदार यांनी भेट देउन आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असे सांगितले. सरकारने ही पाईपलाईन खाडी व समुद्रकिनाऱ्याला लागून नेल्यास भूसंपादनाचा विषय राहणार नाही व सरकारी तिजोरीतील पैसेही वाचतील, असे सर्व शेतकऱ्यांनी जाहीरपणे सांगितले.

या उपोषणासाठी दिलीप पाटील, रवींद्र म्हात्रे, मसद सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, मा. सरपंच बळीराम भोईर, जोहे मा. सरपंच काशिनाथ पाटील, आर.के.सर, विजय पाटील, चंद्रहास ए.बी. पाटील, विनोद म्हात्रे, सूर्यकांत पाटील, रविकांत म्हात्रे यांसह अनेक ज्येष्ठ, महिला, मुले व तरुणांनी सहभाग नोंदवीला. दरम्यान, शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे उपस्थितांनी सांगितले.

Exit mobile version