18 डिसेंबरला मूक मोर्चाचे आयोजन
| गडब | वार्ताहर |
प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील डोलवी, काराव, वडखळ, बोरी हद्दीतील होणारे भूसंपादन रद्द करावे, यासाठी येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.18 रोजी पेण उपविभगीय कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळामार्फत डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब वडखळ, बोरी परिसरातील येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात येणार आहेत. सदर भूसंपादन करताना शासनाने शेतकऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता नोटीस बजावल्यामुळे या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, सर्व बाधित शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. या भूसंपादनास येथील ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध असल्याबाबत ग्रामसभा व मासिक सभेचे ठरावही घेण्यात आले आहेत. सदर भूसंपादन रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. हा मोर्चा गडब येथून निघून उपविभागीय कार्यालय पेण येथे जाईल. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी पेण यांना शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आले आहे.