शेतकरी हवालदिल; भाताची पिके जमिनीवर कोसळली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात भाताच्या पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाने सतत झोडपले आहे. मे महिन्यातील पहिल्याच आठवड्यात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर शेतात उभी असलेली पिके वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीवर कोसळली आहेत. शासनाच्या अधिकाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत असून, पंचनामे करूनदेखील मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.


मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात आलेला पाऊस पाच महिने मुक्काम ठोकून आहे. लवकर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भाताची रोप तयार करता आली नव्हती. त्यानंतर ज्यांनी रोप तयार केली त्यांना आता लांबलेल्या पावसाने झोडपून टाकले आहे. कापणीस आलेली भातशेती अक्षरशः भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीची वर्षभराची पिके क्षणात पाण्याखाली गेल्याने तालुक्यात हताशा आणि वेदनेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वारे, कळंब, गरूडपाडा, पोशिर, जमरुख, टेम्भेरे, खांडस, वेणगाव, बारणे गौरकामथ अशा बहुतांश भागात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीसाठी सज्ज झालेली भातशेती चिखलात कोसळली असून, शेतांच्या बांधांना भगदाड पडल्याने माती वाहून गेली आहे. सध्या शेतकरी डोळ्यादेखत आपली शेती उद्ध्वस्त होताना बघत आहेत.

वाढती मजुरी, महाग झालेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके या खर्चाचा डोंगर उचलून शेतकऱ्यांनी कसेबसे पिक उभं केलं होतं. पण नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या स्वप्नांची राख केली. शेती परवडत नाही, त्यातही असा पाऊस म्हणजे डोंगरा एवढं संकटच आहे.

शशिकांत तुरे,
शेतकरी, कळंब

कळंब तसेच गरूडपाडा परिसरातील भातशेती अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसानभरपाई मिळवून द्यावी. नाहीतर आमच्यावर निश्चितच उपासमारीची वेळ येईल.

दशरथ मुने
शेतकरी, बारणे

मागील वर्षी अशाच प्रकारे भाताचे पिकाची नासाडी झाली होती. त्यानंतर मे महिन्यात पाऊस आल्याने आमच्या राजनाला कालवा असलेल्या परिसरातील किमान एक हजार एकर जमिनीमधील भातपिकाची कापणी न करता तसेच सोडून द्यावे लागले होते. त्यानंतर कडधान्य पाण्यात भिजून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नव्हते.

विनय वेखंडे
शेतकरी, वदप

Exit mobile version