शेतकऱ्यांची भाजीपाला रोपांना मागणी

ओलाव्यावर शेतकऱ्यांचा पर्यायी मार्ग

| माणगाव | प्रतिनिधी |

पावसाने लवकरच घेतलेली माघार, जमिनीतील कमी झालेला ओलावा आणि वाढत्या उष्णतेमुळे शेतीसमोर नवे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीवरही त्याचा परिणाम होत असताना भाजीपाला लागवडीसाठी मात्र माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तयार रोपवाटिकांचा पर्याय स्वीकारला आहे. बियाण्यांची पेरणी करून रोपे तयार करण्याऐवजी थेट 20 ते 30 दिवसांची तयार रोपे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून रोपवाटिकांमध्ये वांगी, टोमॅटो, मिरची यांसह विविध भाजीपाला रोपांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

माणगाव तालुक्यात रब्बी हंगामात कडधान्य शेतीबरोबरच भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा गणेशोत्सवानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतजमिनीतील ओलावा झपाट्याने घटला आहे. त्यामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीवर परिणाम होत असून भाजीपाला लागवडीचे नियोजनही शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक बनले आहे. कोरड्या जमिनीत थेट बियाणे पेरल्यास त्याच्या उगवणीसाठी आवश्यक ओलावा मिळण्याची शाश्वती नसते. परिणामी बियाणे वाया जाण्याची आणि लागवडीचा कालावधी लांबण्याची शक्यता असते.

या परिस्थितीत तयार रोपांचा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. रोपवाटिकांमध्ये साधारण दोन रुपयांना एक रोप उपलब्ध होत असून 20 ते 30 दिवसांची वाढ झालेली रोपे थेट शेतात लावता येत आहेत. वांगी, टोमॅटो, मिरची, झेंडू आदी रोपांना विशेष मागणी आहे. तयार रोपांच्या लागवडीमुळे बियाणे रुजविण्याचा सुरुवातीचा कालावधी वाचत असून, भाजीपाला उत्पादन लवकर सुरू होण्यास मदत होत आहे. परिणामी बाजारपेठेत भाजीपाला लवकर पोहोचवून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे नियोजन बदलत असताना उपलब्ध पर्यायांचा वापर करून उत्पादन टिकविण्याचा प्रयत्न माणगाव तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. तयार रोपांकडे वाढलेला कल हा केवळ सोयीचा पर्याय नसून बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचेही द्योतक ठरत आहे.

Exit mobile version