। बीड । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्यामध्ये चार वर्षापासुन दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.ही सत्ताधार्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही. दोन महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात जवळपास 50 शेतकर्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले. ही गंभीर बाब आहे. शेतकर्यांच्या आत्महत्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देत शेकापचे भाई मोहन गुंड यांनी कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या न करण्याचे भावनिक आवाहन शेतकर्यांना केले आहे.
मोहन गुंड यांनी पत्रकात म्हंटले आहे कि, बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना विनंती आहे की, तुम्हाला असलेली अडचण आज ना उद्या दूर होईल.डोक्यावर असलेले कर्ज आज ना उद्या फिटेल. काही अडचणी असतील, खासगी सावकार असेल, अथवा बँका असतील, वीज बिलाचा प्रश्न असेल किंवा काही शासकीय अडचणी असतील तर मला 9423979492 या क्रमांकावर फोन करुन अडचण सांगावी. अथवा शेकापच्या कुठल्याही सहकार्यांना कळवावे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
शेतकरी भावांनो कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या करून बायको, लेकरं बाळांना उघड्यावर टाकु नका. आत्महत्या करणे हा मार्ग नाही. जीवनात चढउतार येत असतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे भावनीक आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे शेतकर्यांना केले आहे.अगदी कमी वयातील तरुण शेतकरी आत्महत्या करीत आहेत. रोज एक आत्महत्या होत आहे. सर्वच आत्महत्यांचे कारण पाहीले तर आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. चार वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ शेतकर्यांचे मनोबल ढासळवत आहे. मध्यंतरी अतिवृष्टीच्या काळात हाताला आलेले पिक गेले. होत्याचे नव्हते झाले. मदत करायची वेळ आली की राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवणार तर केंद्र सरकार राज्यावर हे काय चाललंय?
सरकारचे खेळ कोणीही समजू शकत नाही. सरकारच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. घेतलेले कर्ज कसे फेडायचे? विज बील कसे भरायचे? शेतकर्यांना पिक कर्जासाठी बँकांनी दारातच उभे राहू दिलेले नाही. अजूनही काही शेतकर्यांचे पिक कर्ज झालेले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.