शेतकऱ्याची डॉक्टर मुलगी रणांगणात

डॉ. वैष्णवी ठाकूर यांना मतदारांचा कौल

| चणेरा | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार घोसाळे जिल्हा परिषद गटातून डॉ. वैष्णवी ठाकूर व पंचायत समिती गणातून शंकर दिवकर, तसेच न्हावे पंचायत समिती गणातून रुपाली मढवी यांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. यादरम्यान, शेतकऱ्याची मुलगी आणि उच्चशिक्षित डॉक्टर अशी ओळख असलेल्या डॉ. वैष्णवी ठाकूर यांच्या पाठीशी येथील शेतकरी, कष्टकरी आणि सुशिक्षित तरुण मोठ्या ताकदीने उभे राहत असल्याचे चित्र आहे.

डॉ. वैष्णवी ठाकूर यांचे वडील हेमंत ठाकूर हे रायगड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन असून त्यांनी शेती आणि शेतकरी जगला पाहिजे, यासाठी आयुष्यभर तन-मन-धनाने काम केले आहे. आता शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रशासकीय पातळीवर सोडवण्यासाठी, आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी हक्काचा आणि सुशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी घोसाळा, चणेरा व यशवंत परिसरातील मतदारांना केले आहे.

डॉ. वैष्णवी ठाकूर या उच्चशिक्षित असून पनवेल येथील नामांकित पुरोहित हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टर म्हणून सेवा बजावत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य, स्वच्छता, पाणीटंचाई आणि बेरोजगारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांची त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून सखोल जाण आहे. प्रशासकीय कामकाजासाठी सुशिक्षित, संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वाची गरज ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

प्रचारादरम्यान डॉ. ठाकूर यांनी, प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा, सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीवर ठोस उपाय, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी, शेतीविषयक प्रशासकीय अडचणी सोडवून न्याय मिळवून देणे या प्रमुख मुद्यांवर भर दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ‌‘खटारा’ हे चिन्ह ग्रामीण भागातील अस्मितेचे प्रतीक मानले जाते. घोसाळे गटाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. वैष्णवी ठाकूर, घोसाळे पंचायत समिती शंकर दिवकर तसेच न्हावे पंचायत समीती रुपाली मढवी यांना निवडून द्या आणि त्यांना जनसेवा करण्याची संधी द्या, अशी विनंती शेतकरी कामगार पक्षाच्या तर्फे मतदारांना करण्यात आली आहे. या उमेदवारीमुळे घोसाळे जिल्हा परिषद गणात गटात शेकापची बाजू अधिक भक्कम झाली असून तरुण, शेतकरी आणि कष्टकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version