शेतकर्‍यांचे डोळे वरुण राजाकडे

मान्सूनचे आगमन नाही, बळीराजा चिंतातूर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
जूनचा दुसरा आठवडा सरत चालला असतानाही पाली-सुधागडसह जिल्ह्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. शिवाय यंदा मान्सूनपूर्व सरीदेखील कोसळलेल्या नाहीत. यंदा 95 हजार हेक्टरवर भात लागवडीचे कृषी विभागाचे नियोजन आहे. शेतकर्‍यांची मशागतीची जवळपास सर्व कामे आटोपली आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे डोळे वरुण राजाकडे लागले आहेत. पावसावर शेतकर्‍यांच्या शेतीच्या कामाची गणिते अवलंबून असतात. मात्र पावसाने पाठ फिरवली की शेतकर्‍यांपुढे अनेक आव्हाने उभी राहतात.

यंदा पाऊस लवकर पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शेती पूर्व कामे आटोपली आहेत. मात्र अजूनही पावसाची चिन्ह दिसत नाहीत. वळवाचा पाऊस देखील पडलेला नाही. शिवाय 10 हजार हेक्टरवर धूळ पेरणीसुद्धा झाली आहे. परिणामी पाऊस उशिरा आल्यास शेतकर्‍यांचे नियोजन बिघडणार आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे. शेतकर्‍यांनी घाई न करता पावसाचा अंदाज घेऊन जमीन ओली झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार. राष्ट्रीय माहिती केंद्र पुणे यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात 8 जून पर्यंत सर्वसाधारण सरासरी 174.9 मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र यंदा 8 जूनपर्यंत अवघ्या 1.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.सध्या ठिकठिकाणी काळे ढग दाटून येतात मात्र पाऊस काही पडत नाही.

शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. धूळ पेरणी सुद्धा करून ठेवली आहे. आता पावसाची वाट पाहत आहोत. यंदा पाऊस खूप लांबला आहे. वळवाचा पाऊस देखील आला नाही. काही दिवसांत मुसळधार पाऊस आल्यास बियाणे फुकट जाण्याची भीती आहे. आणि नाहीच आल्यास दुबार पेरणीचे संकट आहे.

-रमेश पवार, शेतकरी, जांभुळपाडा-सुधागड

पावसाने दडी दिल्यामुळे बळीराजा चिंतातुर आहे. पुढील काही दिवसांत पाऊस आला नाही तर सर्व नियोजन बिघडेल. मेहनत देखील वाया जाईल. शासनाने यासंदर्भात आगाऊ उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करण्याचीही गरज आहे.

– शरद गोळे, सचिव, कृषिमित्र संघटना

शेतकर्‍यांनी मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा बियाणे वाया जाऊ शकते.

– उज्वला बाणखेळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Exit mobile version