शेतकरी सुखावले,निसर्गाचे अभुदपूर्व रूप
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
जिल्ह्यात अखेर सर्वत्र वरुणराजाचे आगमन झाले आहे. त्यामुळे सजीव सृष्टी, शेतकरी सुखावले आहेत. शेतकर्यांची पेरणीची कामे सुरू झाली आहेत. पक्षी घरट्यात विसावले आहेत. झाडे, वेली व वृक्ष पावसाने न्हाऊन निघाले आहेत. ओल्या मातीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला आहे. सर्वत्र गर्द काळे ढग दाटून आले आहेत. निसर्गाचे अभुदपूर्व रूप डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
यंदा जूनच्या दुसर्या आठवड्यात देखील पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे आटपून बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. मात्र आता उशिरा आलेल्या पावसानंतर शेतकर्यांची भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात 95 हजार हेक्टरवर भात लागवड केली जात आहे.
बाजारात शेवळ, कुर्डू, शेंडवळ,अळू आदी रानभाज्या दिसू लागल्या आहेत. पहिल्या पावसातच निघणारे मुठे (खेकड्याची एक जात) पकडण्यासाठी खवय्ये रात्री माळरान, शेत व डोंगरावर बाहेर पडत आहेत. वळगणीचे मासे पकडण्यासाठीची तयारी व नियोजन अनेक मंडळी करत आहेत. अनेक दिवसांपासून झाडांच्या पानावर बसलेला धुरळा व मातीचा थर पहिल्या पावसात धुऊन निघाला आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवेगार वनस्पती दिसत आहेत.
गावातील कौलारू घरे आता उठून दिसत आहेत. रानावनातील डबकी दगडातील खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे पशुपक्षांची व मोकाट जनावरांची पाण्यासाठीची फरपट थांबली आहे. शिवाय काही दिवसांनी ठिकठिकाणी हिरवे गवत उगवल्यावर चार्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. नवकवींना काव्याचे धुमारे फुटू लागले आहेत. अनेकज बरसणार्या पावसाचे व्हिडीओ व फोटो समाज माध्यमांवर पाठवत आहेत. रोपवाटिकाधारकांचा व्यवसाय आता जोर धरणार असल्याने तेही आनंदी झाले आहेत. उन्हाची काहिली देखील कमी झाली असून वातावरणात सर्वत्र गारवा जाणवत आहेत. बच्चे कंपनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. एकूणच सार्या सजीव सृष्टीला आंनदात न्हाऊन निघाली आहे.