नरेंद्र साळवी यांच्यावर उपासमारीची वेळ
| वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील नडोदे गावातील शेतकरी नरेंद्र चंदू साळवी यांच्या शेतीचे सोन्याचे मोल असलेले क्षेत्र उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे अक्षरशः मातीमोल झाले आहे. टाटा पॉवर कंपनीच्या तीन उच्चदाब वीज वाहिन्या त्यांच्या स.नं. 36 मधील जमिनीवरून गेल्या आहेत. या वाहिन्यांमुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट झाली असून, कोणताही शेती, व्यवसाय किंवा जोडव्यवसाय यशस्वी होत नाही, असा आरोप साळवी यांनी केला आहे.
नरेंद्र साळवी यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असून, ते पारंपरिक भातशेती करत होते. परंतु, वाढता खर्च आणि तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. सुमारे 6-7 लाख रुपये गुंतवून पोल्ट्री शेड, वीज कनेक्शन आणि पक्ष्यांसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती केली. मात्र, पक्ष्यांच्या वाढीवर विद्युत वाहिनीच्या रेडिएशनमुळे विपरीत परिणाम झाला. पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे हवेत पसरणार्या रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर व वजनवाढीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी गीर गायी आणल्या, परंतु गायींच्या दूध उत्पादनावरही तसाच विपरीत परिणाम झाला. इतर भागातील गीर गायी त्यांच्या गायींच्या तुलनेत अधिक दूध देत असल्याचे नरेंद्र साळवी यांनी सांगितले आहे. नरेंद्र साळवी यांच्या जमिनीवरून गेलेल्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे त्या क्षेत्राचे बाजारमूल्यदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेजारील जमिनी, जिथे वीज वाहिन्या नाहीत, त्या जमिनींना चांगला बाजारभाव मिळतो व शेतीतही चांगले उत्पादन होत आहे. मात्र, साळवी यांच्या जमिनीसाठी कोणीही योग्य भाव देण्यास तयार नाही. 2007 साली त्यांनी बिकट परिस्थितीत 6 एकर जमीन फक्त 20,000 रुपये प्रतिएकर या तुटपुंज्या भावाने विकली. साळवी यांनी गेल्या 12 वर्षांसाठी प्रतिएकर 50,000 रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, जमिनीचे चालू बाजारभावाच्या तीन पट किमतीने अधिग्रहण करण्याची मागणी केली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट झाली असून, पिकांचे उत्पादन होत नाही. कोणताही जोडव्यवसाय यशस्वी होत नाही. साळवी यांची शेती कवडीमोल झाली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून त्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी आणि न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे शेतीव्यवसाय करता येत नाही, त्यामुळे दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन करण्याचा प्रयत्न केला; परंतु रेडिएशनमुळे हा व्यवसायदेखील आम्ही करू शकत नाही आणि शेती विकायचे तर आमची शेतीदेखील कोणी घ्यायला तयार नाही, त्यामुळे शेतीचे सोन्याचे मोल असलेले क्षेत्र अक्षरशः मातीमोल झाले आहे.
नरेंद्र साळवी,
पीडित शेतकरी