चरी संपामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळाला- पंडित पाटील

| भाकरवड | वार्ताहर |

चरी येथे केलेल्या संपामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळाला, राज्यकर्त्यांना संपामुळे कसेल त्याची जमिन हा नैसर्गिक न्यायतत्व अंमलात आणणारा कुळ कायदा तयार करावा लागला, असे प्रतिपादन माजी आम.पंडित पाटील यांनी रविवारी चरी येथे केले.

चरी येथील शेतकर्‍यांच्या संपाला 89 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जि.प.सभापती चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सरपंच नीलम पाटील, उपसरपंच अभय पाटील, उपसरपंच कुरकोंडी जयश्री माणिक, जेष्ठ नागरिक नारायण पाटील, दत्तात्रेय पाटील, माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी सरपंच विजय ठाकूर, माजी सभापती प्रकाश पाटील, साहित्यिक सुधाकर पाटील, उरणचे महेंद्र ठाकूर, रोहित जाधव, तेजश्री ठाकूर, शुभांगी पाटील, भारती पाटील, उमाकांत पाटील, प्रमोद भगत, जगदीश थळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंडित पाटील यांनी चरी संपाचा इतिहास सांगितला. ज्या अभूतपूर्व संपामुळे कसेल त्याची जमीन हा नैसर्गिक न्याय अंमलात आणणारा कुळ कायदा तयार झाला. त्या चरी संपाला स्व. नारायण नागु पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्फ आप्पासाहेब यांच्याबरोबरच भाई चित्रे, चंद्रकांत अधिकारी, श्यामराव परुळेकर सुरबानाना टिपणीस आदी खांद्याला खांदा लावून नेतृत्व करीत होते. या लढ्याचे लोण केवळ अलिबाग तालुक्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे लोण उरण तालुक्यातील भेंडखळ, जसखार येथे पोचले त्या संपामुळे कुळकायदा अस्तित्वात आला आणि स्वातंत्र्यानंतर कसेल त्याची जमीन हे तत्व प्रस्थापित झाले आणि आपण जमिनीचे मालक झालो आहोत असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

आज त्या घटनेला 89 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी त्यावेळी खोत सावकारांकडे होती आणि आपली पूर्वज केवळ वेट बिगार म्हणून राबत होती. त्या शोषण विरुद्ध आपल्या समाजातील एक लढवय्या नेता स्व. नारायण नागु पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शेतकर्‍यांना संघटीत करून आपल्या हक्का साठी जागृत केले त्यातून हा कायदा अस्तित्वात आला,असेही त्यानी सांगितले.

दरम्यान, चरी येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दिवसभरात चरी, कोपर, कोपर पाडा परिसरातील शेतकर्‍यांनी अभिवादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत चरी, ग्रामस्थ कोपर, कोपर पाडा, प्राथमिक शाळा चरी यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मनोज थळे यांनी केले

सायकल स्पर्धेने प्रारंभ
यावेळी सायकल स्पर्धा आयोजित करून याचे उद्घाटन करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांनी चरी ग्रामपंचायत हद्दीतील 70 मुलींना मोफत सायकलींचे यापूर्वीच वाटप केले होते. त्या मुलींना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरपंच नीलम पाटील यांनी सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील विजेत्यांना त्यांना पारितोषिक, रोख रक्कम ताराबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात आली.

Exit mobile version