मिळकतखार अनधिकृत भरावाचा शेतकऱ्यांना फटका

भातशेतीसह गावांमध्ये पाणीच पाणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

मिळकतखार येथे वासवानी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या अनधिकृत भरावाचा शेतकऱ्यांसह गावांना फटका बसला. गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाचे पाणी शेतांसह गावांमध्ये साचले. संपूर्ण परिसर जलमय झाले. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतजमीनींचे प्रचंड नुकसान झाले. गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. मात्र, गावांत साचलेले पाणी ग्रामस्थांनी श्रमदानातून जेसीबीच्या मदतीने काढून गावांतील पुराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदन सादर करून न्याय मिळण्यासाठी साकडे घातले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, मिळकतखार येथे गट नं. 47/2 49, 50 व 51 इत्यादी या मिळकतीवर वरुण गोविंद वासवाणी आदींनी अनधिकृत भराव केला. या भरावामुळे पाण्याचा पाण्याचा मूळ प्रवाह बंद झाला आहे. तो पूर्ववत करून द्यावा, अशी मागणी केली आहे. अर्जदार हे ग्रुप ग्रामपंचायत मिळकतखार येथील स्थानिक रहिवासी आहेत. त्यांची वडिलोपार्जित शेती मिळकतखार येथे आहे. वरुण गोविंद वासवाणी यांची ग्रामस्थांच्या शेतजमिनीलगतच मिळकती आहेत. वासवानी यांनी काही स्थानिक गुंड तसेच लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन त्या मिळकतीवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या स्लॅगचा अनधिकृत भराव केला. शासनाची कोणतीही परवानगी न घेता खारभूमी पुनर्प्रस्थापित क्षेत्रामध्ये भराव केले आहे. त्यामुळे परंपरागत पाण्याचा स्त्रोत पूर्णतः बंद झाला आहे. पावसाचे पाणी याच नाल्यातून जात होते. हा पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे पिकत्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

पाण्याचा प्रवाह स्लॅग टाकून बंद करण्याचे काम चालून असताना ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, अलिबागचे तहसीलदार यांना भेटून लेखी तक्रार केली होती. पाण्याचा स्त्रोत पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले होते. अनधिकृत भरावाबाबत वासवानी यांच्याविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वासवानी यांनी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत भराव टाकण्याचे काम सुरुच केले. त्यामुळे आज पाण्याचा स्त्रोत बंद झाला आहे. पावसाळा सुरू झाला आहे. अनधिकृत स्लॅग व माती भरावामुळे भातशेतीसह गावांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ग्रामस्थांचा इशारा
वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांना याठिकाणी कोणत्याही प्रकारची भरावाची परवानगी देऊ नये. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचविण्यात याव्यात. जेएसडब्ल्यू कंपनीचे वेस्टेज (स्लॅग) भरावामुळे खूप मोठी हानी झाली आहे. पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू करण्यात यावा. वासवाणी वगैरे यांना कोणत्याही प्रकारच्या भरावाची परवानगी देऊ नये. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Exit mobile version