| अलिबाग | प्रतिनिधी |
मिळकतखार येथे वासवानी ग्रुप यांच्यामार्फत अनधिकृत भराव करण्यात आला. या भरावाचा फटका बाजूला असलेल्या शेतजमिनीसह गावांनादेखील बसला. शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शनिवारी (दि. 21) भरावाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधला. अनधिकृत भरावामुळे शेतकरी, ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीबाबत त्यांन संताप व्यक्त केला. शेतकरी, ग्रामस्थांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल पाटील, अमिता शेट्ये, माजी उपसरपंच जगदीश म्हात्रे, तुळशीदास पाटील, बाळनाथ मिनमिने, रमेश म्हात्रे, विनय कडवे, निखील कडवे, रसिकांत पाटील, जतीन म्हात्रे, अमित पाटील, शशिकांत तवसाळकर, प्रकाश केळसकर, बबन म्हात्रे, धर्मनाथ म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, देवराम पाटील, नितीन मोकल आदी ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
मिळकतखार येथे सुरू असलेल्या भरावाविरोधात अनेक वेळा ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. जेएसडब्ल्यू कंपनीमधील टाकाऊ मालामार्फत भराव करण्यात आला. ही बाब अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या भरावामुळे गावांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी अनधिकृत भराव काढायला सांगू, असे आश्वासन दिले होते. मात्र, कार्यवाही दिसून आली नाही. धनदांडग्यांनी केलेल्या भरावामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी तुंबले आहे. आजूबाजूच्या गावामध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. भरावामुळे अडलेले पाणी ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबीच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आली. विकासाच्या नावाखाली झालेल्या या अनधिकृत भरावाबाबत प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शनिवारी (दि.21) चित्रलेखा पाटील यांनी मिळकतखार येथे भरावाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. भरावामुळे बाजूला असलेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली. गावांना या भरावाचा धोका असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अनधिकृत भरावाबाबत चित्रलेखा पाटील यांनी संताप व्यक्त केला. शेतकरी, ग्रामस्थांचे नुकसान करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि कायदेशीर लढाई लढली जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.