आधी चिखलफेक, आता फुलांची उधळण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
झिराडच्या सरपंच दर्शना दिलीप भोईर यांचे पती तथा विधानसभेचे माजी उमेदवार दिलीप भोईर व मुलगा राहुल भोईर हे पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांची गावामध्ये दहशत आहे. त्यांच्या हुकूमशाहीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र आ. महेंद्र दळवी यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, आज केवळ स्वतःच्या फायद्यासाठी दळवींच्या मते गुन्हेगार असणाऱ्या दिलीप भोईर यांना दळवींनी थाटामाटात पक्षात घेतल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अलिबाग-रोहा-मुरुड विधानसभा मतदारसंघाची 2024 ची निवडणूक दिलीप भोईर आणि महेंद्र दळवी यांच्या चिखलफेकीमुळे चांगलीच गाजली. दोघांनी पातळी सोडून एकमेकांची उणीधुणी काढली. कार्यकर्त्यांमध्येही झुंपली होती. एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या. त्यामुळे भोईरांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण झाला होता. मात्र, आज या दोघांच्या गळाभेटीमुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा रंगली आहे.
काँग्रेसला तांडेलच नाही; महेंद्र दळवींची थट्टा
दिलीप भोईर यांनी काँग्रेसला छेद करीत एक वेगळ्या भूमिकेतून जिल्ह्यात काम केले. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी जिल्ह्यात प्रामाणिक काम करून भाजप पक्ष वाढविला. जिल्ह्यात सध्या काँग्रेसला तांडेलच नाही, अशी अवस्था असल्याची थट्टा आमदार महेंद्र दळवी यांनी याप्रसंगी केली.
दुखावलेल्या राजा केणींचे काय होणार?
दळवींचे खास म्हणून राजा केणींची ओळख आहे. दळवींच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या दिलीप भोईरांसमोर केणी ढाल बनून उभे राहिले. वेळप्रसंगी स्वतःचे चारित्र्य पणाला लावले आणि भोईरांनी केलेल्या सर्वच आरोपांना सडेतोड उत्तर दिले. माकडचाळे, महाचोर असे अनेक आरोप-प्रत्यारोप करुन राजकारणाची पातळी सोडली. मात्र, दळवींच्या अंगावर येऊ दिले नाही. या दोघांमधील वाद सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र, केवळ दळवींच्या अट्टाहासापोटी केणींना भोईरांसोबत एकाच व्यासपीठावर बसावे लागत आहे. त्यामुळे दुखावलेल्या केणींचे पुढे काय होणार?, त्यांचे शिंदेसेनेतील महत्त्व कमी होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
युतीत राहून भाजपशी वैर
केंद्रासह राज्यात व रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. या महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरूद्ध शिंदे गट वाद जगजाहीर असताना, आता भाजपसोबतही शिंदे गटातील अंतर्गत वाद असल्याचे दळवी यांच्या भाषणातून दिसून आले आहे. युतीत राहून भाजपशी वैर करण्याचे काम शिंदे गटाकडून होत असल्याचे यावरून स्पष्ट होऊ लागल्याने भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीमधील काही मंडळी आक्षेपार्ह बोलतात. त्यांचा धंदा आहे, असाही टोला महायुतीमधील पक्षातील नेत्यांना लगावला.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
निवडणुकीत एकमेकांच्या जीवावर उठलेल्या कार्यकर्त्यांसाठी हा पक्षप्रवेश म्हणजे चांगलीच चपराक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीमुळे वैर पत्करलेल्या कार्यकर्त्यांना हा निर्णय पचविणे थोडे जड जात असल्याचेही त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून समोर आले आहे.