एमआयडीसीविरोधात सोमवारी शेतकऱ्यांचा मोर्चा

उपविभागीय कार्यालयावर धडकणार

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. या भूसंपादनाच्या विरोधात येथील शेतकरी 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता हजारोंच्या संख्येने शेतकरी उपविभागीय कार्यालयावर येथे मोर्चाने धडकणार आहेत.

तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी, जुईबापुजी या गावांतील 2120 एकर जागा संपादन करण्याचे ठरवले आहे. त्या प्रकारच्या नोटिसादेखील प्रांत कार्यालयातून काढण्यात आलेल्या आहेत. 418 एकर जेएसडब्ल्यू आणि 165 एकर सरकारी जमीन वगळता 1537 महाराष्ट्र शासनाने नियोजित डोलवी औद्योगिक प्रकल्पाकरिता सुमारे 2100 एकर जमिनीसाठी अधिसूचना काढली आहे. जेएसडब्ल्यू कंपनी अरेरावी, दांडगाई करून स्थानिकांना चिरडण्याच्या हेतूने कटकारस्थान रचत असल्याने या प्रवृत्तीला पायबंद घालणे गरजेचे आहे. असे न केल्यास भविष्यात स्थानिकांना परप्रांतियांसारखे जगावे लागेल. स्वतःच्या अस्तित्वासाठी हा मोर्चा काढत असल्याचे म्हणणे बाधित शेतकऱ्यांचे आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या पाच मागण्या
1. प्रस्तावित डोलवी एमआयडीसीकरिता काढण्यात आलेली 11 गावासाठीची भूसंपादनाची अधिसूचना पूर्ण रद्द करावी.
2. खाऱ्या पाण्याने भिजलेल्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी. त्याचप्रमाणे खाडीच्या बाह्यकाठ्याची व शेतीच्या अंतर्गत बांधबंधिस्तीची दुरूस्ती करावी.
3. ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागा व खाजण तेथील ग्रामस्थांच्या विकास कामाकरीता (गावठाण विस्तार, क्रीडांगण,समाजमंदीर इ.) राखीव ठेवणे. त्या जागा कंपनीस विक्री अगर भाड्यापट्याने देऊ नये.
4. जेएसडब्ल्यूच्या वाढीव औद्योगिकीकरणामुळे प्रदुषण व पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भविष्यात गावे उठवावी लागणार आहेत. त्यामुळे शासनाने अशा प्रदूषणकारी जेएसडब्ल्यू कंपनीस वाढीव औद्योगिकीकरणास परवानगी देउ नये.
5. हेटवणे धरणाचे पाणी सिंचनासाठी देउन शेती दुपिकी करावी.

सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता रामवाडी हुतात्मा विनायक पांडुरंग कोल्हटकर स्मारक रामवाडी येथून मुक मोर्चाला सुरूवात होऊन हा मोर्चा उपविभागीय कार्यालयात (प्रातकार्यालय) हजारोंच्या संख्येने धडकरणार आहे.

Exit mobile version