| मुंबई | प्रतिनिधी |
जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. 2012 नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, विद्यमान 1 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य शासनाने या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या अनुदानाची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून 2 लाख इतकी करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत आतापर्यंत अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशांतील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पिक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम शेतीपद्धती यांचा अभ्यास करून आलेले आहेत.







