‘रामपेठ’ वेब पोर्टलचे लाँचिंग; रायगड जिल्हा एमपेक्स सहकारी फेडरेशनची वार्षिक सभा संपन्न
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा एमपेक्स सहकारी संस्थेचे फेडरेशन या जिल्हास्तरीय महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योजकांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या रामपेठ या महत्त्वाकांक्षी वेब पोर्टलचे उद्घाटन मा. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे या सभेचे मुख्य आकर्षण ठरले.
या वार्षिक सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खेरे, बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षपद रामपेठचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी भूषवले.
सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या मागील आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडण्यात आला आणि वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. गेल्या वर्षभरात संस्थेने यशस्वीपणे राबवलेल्या गोदाम सेवा, कर्मचारी प्रशिक्षण सेवा, मनुष्यबळ सेवा आणि डाटा सेवा या सर्व आघाड्यांवरील कामकाजाचा विस्तृत आढावा यावेळी सभासदांसमोर ठेवण्यात आला.
सभासदांना मार्गदर्शन करताना मंदार वर्तक यांनी सहकार चळवळीची पुढील दिशा स्पष्ट केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची महत्त्वाची भूमिका आणि रामपेठच्या माध्यमातून ही बँक कशा प्रकारे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार आहे, याची सविस्तर मांडणी त्यांनी आपल्या भाषणात केली. प्रमुख पाहुणे मा. आमदार जयंत पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात संपूर्ण रामफेडच्या कामकाजाचे सविस्तर विवेचन केले. ही संस्था आगामी काही वर्षांत जिल्ह्याच्या विकासात फार मोठे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, संस्थेच्या भविष्यातील कामकाजात कशा प्रकारे विविधता असणार आहे आणि संस्था कोणकोणत्या नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे, याचेही मार्गदर्शन त्यांनी केले.
रामपेठ वेब पोर्टलचे उद्घाटन
सभेतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे रामपेठ या वेब पोर्टलचे लाँचिंग. मा. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते या पोर्टलचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकरी यांना हक्काची मार्केटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
जगभरात विकता येणार शेतमाल
या डिजिटल सुविधेमुळे आता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल
थेट जगातल्या कुठल्याही ग्राहकाला विकता येणार आहे. शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय जागतिक बाजारपेठेशी जोडणारी ही एक अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धत विकसित करण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी व उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करत या सभेची सांगता झाली.







