पनवेलच्या शेतीमध्ये चढणार टोमॅटोची लाली

| पनवेल | प्रतिनिधी |

मागील काही दिवसांत बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर पाहता पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी घाटमाथ्यावरून रोपे आणली आहेत, तर काहींनी कृषी प्रदर्शनात जाऊन या संबंधित माहिती घेऊन आपल्या घरीच रोपे तयार केली आहेत. अशा प्रकारे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादन घेण्याकडे पनवेलमधील शेकडो शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा पनवेलमधून टोमॅटोचे भरघोस पीक निघणार आहे.

राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्र, तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १५ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. पनवेलमध्ये जवळपास ८ हजार हेक्‍टर क्षेत्रावर शेती केली जाते. यापैकी ७७६३ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. तर ७१ हेक्टरवर भाजीपाला लागवड, उर्वरित क्षेत्रात नागली,वरई, तूर लागवड केली जाते. भाजीपाला लागवड क्षेत्रात कोकण पट्ट्यातही टोमॅटो लागवड केली जात असल्याने आता यामध्ये कोकणातील टोमॅटोची भर पडणार आहे.

कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो; परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाण्याचा तुटवडाही तेवढ्याच जास्त प्रमाणात जाणवतो. आजपर्यंत वर्षानुवर्षे कोकणातील शेतकरी शेतीमध्ये भात, वरी आणि नाचणी यांसारखीच पिके घेत आला आहे. जास्तीत जास्त यापुढे त्याने आंब्याची, सुपारीची आणि नारळीची बाग लावली आहे. त्यापेक्षा वेगळा विचार करण्याचे धाडस शक्यतो कोकणातील शेतकरी करीत नाही. म्हणूनच कोकणातील शेती फक्त पावसाळी होते. इतर वेळी शेती केलेले उदाहरण दुर्मिळच आहे.

मागील काही दिवसांत टोमॅटो या पिकाला सोन्याचा भाव आला होता. त्या अनुषंगानेच येथील शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटो लागवडीवर भर दिला असून एक लाखांच्या वर टोमॅटो रोपे लावली जाणार आहेत. बाजारपेठेत टोमॅटोला जरी कमी भाव मिळत असला तरी वाढते शहरीकरण, औद्योगिक वसाहत, पनवेल व नवी मुंबई जवळ असल्याने या ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारातून टोमॅटो व भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याचे सागर सांगडे या शेतकऱ्याने सांगितले.

यापूर्वी घरी खाण्यासाठी, भाजीपाल्यासाठी थोड्या स्वरूपात टोमॅटो लागवड केली जात असे; परंतु अनुकूल हवामानामुळे योग्य नियोजन व तंत्रज्ञान वापरून या भागात टोमॅटो मोठ्या प्रमाणात पिकू शकतो हे समजल्यानंतर यंदा टोमॅटोचे क्षेत्र वाढवले आहे. घाटमाथ्यावरून काही रोपे आणली असून काही रोपे घरीच तयार केली आहेत. साधारण दहा हजारपेक्षा जास्त रोपे माझ्याकडे असून याची लागवड केली जाणार आहे.

Exit mobile version