तोडगा निघेना, बळीराजा हटेना!

मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार; शंभू सीमेवर शेतकर्‍यांना धक्काबुक्की

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंजाब, हरियाण आणि उत्तर भारतातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी सरकारच्या धोरणातील बदलाची प्रतीक्षा करत होते. मात्र, अद्याप या वादावर शेतकर्‍यांना तोडगा काढण्यात मोदी सरकारला यश आलेले नाही. विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकर्‍यांनी रविवारी (दि.8) दिल्लीत कूच करण्यासाठी ‘दिल्ली चलो’ मार्चचे आयोजन केले होते. पण, हरियाणा पोलिसांनी शेतकर्‍यांना सीमेवरच रोखले. आंदोलक शेतकरी व पोलिसांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.

सकाळी मार्च सुरु होण्याआधी पोलिसांनी आंदोलकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरवात केली. दिल्लीकडे जाण्याची मागणी शेतकरी करत होते पण पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखून धरले. आंदोलक व पोलिस यांच्यात बाचाबाची सुरु झाली. काही शेतकरी बॅरीकेट तोडण्याचा प्रयत्न करू लागले पण पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून शेतकर्‍यांना पांगवले. यामध्ये रेशम सिंग नामक शेतकरी जखमी झाला. यानंतर आंदोलक संतप्त झाले ते पुन्हा दिल्लीकडे कूच करु लागले. पुन्हा अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामध्ये तीन शेतकरी जखमी झाले. त्यानंतर शेतकर्‍यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी शेतकर्‍यांवर फुले टाकण्यास सुरुवात केली. यानंतर शेतकरी नेते सरवण सिंह पधेर हे त्याठिकाणी आले. त्यांनी शेतकर्‍यांना परत फिरण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, शेतकरी फेब्रुवारी 2024 पासून दिल्ली हरीयाणामधील शंभू सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. गेले 300 दिवस हे आंदोलन सुरु आहे. शेतमाला किमान आधारभूत किंमत मिळावी व कर्जमाफी या प्रमुख मागण्यासांठी शेतकर्‍यांचे हे आंदोलन सुरु आहे.

गाव बचावो… अभियान
राजधानी दिल्लीत शेतकरी सरकारविरोधात निदर्शनं करत आहेत. दिल्लीत ’गाव बचाओ देश बचाओ’ अभियान राबवून शेतकरी आंदोलन करत आहेत. रविवारी शेतकर्‍यांनी दिल्लीच्या वेस्ट एन्क्लेव्ह मेट्रो स्टेशनचं नाव बदललं. शेतकर्‍यांनी वेस्ट एन्क्लेव्ह मेट्रो स्टेशनचं नाव काळ्या शाईनं पुसून तिथं मंगोलपूर कला मेट्रो स्टेशन लिहिलं आहे. या अभियानाद्वारे आतापर्यंत दिल्लीतील 300 हून अधिक गावांना भेटी दिल्या आहेत. पालम 360 खापचे प्रमुख चौधरी सुरेंद्र सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आंदोलन केले. याचबरोबर, 22 डिसेंबरला दिल्लीतील खेड्यापाड्यातील शेतकरी एकत्र येऊन महापंचायत घेणार असून, त्यामध्ये आंदोलनाची पुढील रणनीती ठरणार आहे.
दिखाव्यासाठी चर्चा
सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप तोडगा निघाला नाही. विकासासाठी शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. तर शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंतची चर्चा केवळ दिखाव्यासाठीच राहिली असून शेतकर्‍यांचे मूळ प्रश्‍न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

एमएसपीला कायद्याचा दर्जा मिळावा, जेणेकरून शेतकर्‍यांच्या पिकांची रास्त किंमत निश्‍चित केली जावी, अशी शेतकर्‍यांची इच्छा आहे. वाढत्या कर्जामुळे आणि विजेच्या दरांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे जोपर्यंत सरकार शेतकर्‍यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

सर्वन सिंग पंढेर,
शेतकरी नेते

Exit mobile version