पालकमंत्र्यांना शेतकर्यांनी दिले निवेदन
। माणगाव । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे भूसंपादन माणगाव व रोहा तालुक्यात चालू आहे. साधारण 2014 पासुन येथिल टप्पा क्रमांक 1 च्या भूसंपादनाचे काम चालू आहे. 7 ते 8 हजार एकरचे संपादन शेतकर्यानी संमतीपत्र देऊन कोणताही अडथळा न आणता करून दिले. परंतु आजपर्यंत येथील शेतकर्यांना भूसंपदनाचा मोबदला मिळाला नाही. याबाबत शेतकर्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही साधारण 6 महिन्यांपूर्वी संमतीपत्र दिले असुन सुद्धा आम्हाला भूसंपदानाचा मोबदला मिळाला नाही. तसेच गावातील इतर साधारण 60 टक्के शेतकरी बांधवाना या पूर्वीच मोबदला मिळाला आहे. जर जमिनीचे संमतीपत्र देऊन सुद्धा मोबदला मिळत नसेल तर आम्ही उपोषण सुरू करणार होतो. परंतु माणगाव प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले असता त्यांनी सदर बाबतीत लक्ष घालतो असे आश्वासन दिले तरी अजून काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पालकमंत्री यांना निवेदन देऊन भूसंपादनाचा मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे.