। चिरनेर । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या पागोटे चौक या ग्रीन फिल्ड मार्गासाठी सोमवारी (दि.24) सर्वे करण्यासाठी संबधित अधिकारी त्या ठिकाणी आले होते. मात्र, कळंबुसरे, चिरनेर येथील शेतकर्यांनी संताप व्यक्त करत त्या अधिकार्यांना हुसकावून लावले आहे. शेतकर्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एका खासगी कंपनीला वाचविण्यासाठी तब्बल 300 मीटर वळसा घालून या रस्त्याचा घाट घातल्याचे स्थानिक शेतकर्यांकडून बोलले जात आहे.
केंद्र सरकारने राज्यातील जेएनपीए बंदर ते चौक दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीन फिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्त्वा अंतर्गत भारतातील प्रमुख आणि लहान बंदराशी जोडणार्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास या गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हीटी दळणवळण वाढविण्याची गरज असल्यामुळे हा मार्ग बांधण्याची संकल्पना पुढे आली आहे. हा प्रकल्प जेएनपीए बंदर येथे सुरू होऊन मुंबई-पुणे महामार्गावर संपणार आहे. तसेच, तो मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाला देखील जोडला जाणार आहे.
परंतु, हा मार्ग बांधताना स्थानिक शेतकर्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच त्यांना या ग्रीन फील्डच्या मार्गाची कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. त्याचबरोबर शेतकर्यांना जमिनीचा किती व कसा मोबदला देणार, बाधितांना प्रकल्पात नोकरीच्या संधी मिळणार का, गावामध्ये येण्या-जाण्यासाठी अंडरपासेस किंवा इंटरचेंज कुठे ठेवणार, आदी प्रश्नांची उत्तरे शेतकर्यांमधून उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर एका खासगी उद्योजकाची जमीन वाचाविण्यासाठी अनेक शेतकर्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करत या ग्रीन फील्ड मार्गाची बांधणी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कळंबूसरे व चिरनेरच्या शेतकर्यांचा या रस्त्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे या ठिकाणी मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना स्थानिक शेतकर्यांनी हुसकावून लावले आहे.