| पेण | प्रतिनिधी |
प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील काराव, खारघाट, खारमाचेला, खारकारावी क्षेत्रात होणार्या भूसंपादनाला प्रकल्पबाधित शेतकर्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, पेण उपविभागीय कार्यालयात बुधवारी (दि. 15) भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली हरकती अर्जांची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान डोलवी औद्योगिक क्षेत्र प्रकल्पासाठी बाधित असलेल्या शेतकर्यांनी प्रकल्पाला विरोध असल्याची लेखी नोंद केली.
या एमआयडीसी प्रकल्पासाठी काराव 64, खारघाट 317, खारमाचेला 126 आणि खारकारावी 107 शेतकरी बाधित होत असून, या सर्वांची आज संयुक्तरित्या सुनावणी घेण्यात आली. एकूण 614 शेतकर्यांपैकी जवळपास 500 शेतकरी उपस्थित होते. इतर शेतकर्यांना नोटीस रात्री उशिरा 8 वाजल्यानंतर पोहोचली, त्यामुळे शेतकरी या सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, हजर असलेल्या सर्व शेतकर्यांनी एकमुखी भूसंपादनाला विरोध केला असून, याबाबत वैयक्तिक आणि संयुक्तरित्या निवेदन भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना देण्यात आला. यावेळी शेतकर्यांचे शाब्दिकही म्हणणे भूसंपादन अधिकार्यांनी ऐकून घेतले आणि त्यांनी प्रकल्प बाधित शेतकर्यांना अश्वस्त केले की, आपलं वैयक्तिक आणि संयुक्तिक मी वरिष्ठांना कळवेन.
यावेळी के.जी. म्हात्रे, निलेश म्हात्रे, सुनील कोठेकर, सुशील कोठेकर, गजानन पेढवी, लक्ष्मण कोठेकर, चंद्रकांत पाटील, राजू पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.