डिझेल विना शेतकऱ्यांची परवड

पुन्हा शेतीची कामे खोळंबली; शासनाकडून ठोस उपाययोजनाची गरज

| खोपोली | प्रतिनिधी |

आखाती देशातील युद्ध आणि केंद्र सरकारने काळाबाजार रोखण्यासाठी कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यावर कडक निर्बंध घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी व शेतीपंपासाठी डिझेल मिळण्यास अडचणी येत आहेत. पेट्रोल पंपावर डिझेल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे.

“आधी तहसीलदार कार्यालयाची परवानगी आणा मगच डिझेल घेऊन जा” असे पेट्रोप पंप मालकाकडून सांगण्यात येत आहे. आधीच पेट्रोल, डिझेलचा तुटवडा त्यानंतर दरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ आणि त्यातच हे नवे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. यंदा पावसाने देखील उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची कामे देखील खोळंबली आहेत. भविष्यातही अशीच संकटे उद्भवत राहिली तर शेतीच नामषेश होईल, असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

आखाती देशातील युद्धामुळे सध्या देशावर इंधन तुटवड्याचे सावट आहे. त्याचबरोबर काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने अनेक ठिकाणी पेट्रोल व्यवसायात निर्बंध आणले आहेत. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. आजकाल बहुतांश शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा आणि इंधनावर चालणाऱ्या शेतीपंपाचा सर्रास उपयोग करतात. ते चालविण्यासाठी डिझेलची गरज असते. परंतु, आखाती देशातील युद्धामुळे इंधनांचा तुटवडा पडला. त्यामुळे काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. त्यातच यंदा पावसाने देखील उशीरा हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यातच इंधनाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेट्रोल पंपावर शेतकरी डिझेल आणण्यासाठी गेला असता, “आधी तहसीलदार कार्यालयाची परवानगी आणा मगच डिझेल घेऊन जा” असे पेट्रोप पंप मालकाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर शेताच्या बांधासह घराच्या कडेला उभे करून ठेवण्यावची वेळ आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची डिझेल अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायतीच्यावतीने तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात, आमच्या परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले डिझेल दिले जात नाही. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून पंपसेट, पॉवर टिलर, ट्रॅक्टर व इतर शेती अवजारांसाठी डिझेलची तातडीने आवश्यकता आहे. पेट्रोल पंप चालकांकडून डिझेल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबत आहेत व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्या स्तरावर संबंधित पेट्रोल पंप चालकांना योग्य सूचना देऊन प्रत्येक शेतकऱ्यास शेतीच्या गरजेसाठी किमान 5 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.

शासनाने सहकार्य करण्याची गरज
सध्या पावसाचा देखील जोर वाढला आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी शेतीच्या कामांत गुंतला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला डिझेल मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन परवानगी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे जर शेती आणि शेतकरी वाचवायचा असेल, तर शासनाने एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत यावर ठोस उपाय योजना राबवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिझेल मिळण्याच्या कामात सहकार्य करावे, अशी मागणी सध्या शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

शेती व्यवसाय करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. असे असतानाही भातशेती टिकवून ठेवली आहे. त्यातच यावर्षी पावसाने दांडी मारल्याने शेतीची कामे अनेक दिवस खोळंबली होती. त्यानंतर पावसाने काही दिवसानंतर सुरुवात केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनी भात शेतीच्या कामाला सुरुवात केली. शेत उकळण्यासाठी ट्रॅक्टरची गरज असून, त्यासाठी लागणारे डिझेल आता पेट्रोल पंपात मिळत नसल्याने नवे संकट उभे राहिले आहे. पेट्रोल पंप मालकांकडून तहसीलदार कार्यालयाची परवानगी आणा, नंतरच डिझेल मिळेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा शेतीची कामे खोळंबली आहेत. तहसीलदार कार्यालयाने यावर ठोस उपाययोजना राबवून आम्हा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

दत्तात्रेय दिसले,
शेतकरी, केळवली
Exit mobile version