शेतकर्‍याचे तिसर्‍यांदा उपोषण

पाली तहसीलदारांना निवेदन सादर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील इंच इंच जागेला सोन्याचा भाव आलाय, भांडवलदार , विकासक येथील जमिनी वेगवेगळ्या पद्धतीने गिळंकृत करण्यासाठी सरसावल्याचे चित्र दिसत आहे. अशातच येथील अन्यायग्रस्त शेतकरी न्यायासाठी लढताना दिसत आहे. मागील आमरण उपोषणाला एक वर्ष उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी न केल्याने शेतकरी चिंतामण पवार यांनी दि.24 जानेवारीला पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी पत्र सुधागड तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले आहे. शेतकरी चिंतामण पवार यांची आवंढे हद्दीत स्वतःच्या मालकीची सर्व्हे नं. 104 व 106/ब/13 असे दोन सर्व्हे नंबर असतेली जमीन आहे. विकासक पागुर योगेश देसाई यांची शेतकरी पवार यांना लागून 105 हे सर्व्हे नंबर असून, त्याठिकाणी विकासक पागुर देसाई यांचा प्लॉटिंग करून तेथे बंगले बांधण्याचा व्यवसाय सुरु आहे. परंतु, हे करीत असताना विकासक पागुर देसाई यांनी शेतकरी चिंतामण पवार यांच्या सर्व्हे नंबर 104 व 106 मधील 22 गुंठे जागेवर अतिक्रमण केले असल्याचे शेतकरी चिंतामण पवार यांचे म्हणणे असून, सदरचे सातबारा उतारेदेखील पवार यांच्या नावे आहेत.
विकासक पागुर देसाई यांनी शेतकरी चिंतामण पवार यांच्या 22 गुंठे जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर बंगले बांधले आहेत. या अतिक्रमणाबाबत विकासक पागुर देसाई यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यान्वये पाली पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला आहे. शेतकरी पवार यांची जागा हडप करण्याकरिता विकासक पागुर देसाई यांनी पाली तहसील कार्यालयात अधिकार्‍यांच्या सहाय्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले व ते कोर्टात त्याच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याला जोडले असल्याचे शेतकरी पवार यांनी सांगितले.

Exit mobile version