पाली तहसीलदारांना तक्रारी निवेदन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात सध्या ठिकठिकाणी विकासक व भांडवलदार यांच्यामार्फत लहान मोठे प्रकल्प, उद्योग उभारणी बरोबरच नवनवीन इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे. या बांधकामादरम्यान अनेकदा विकासकांकडून स्थानिक व शेतकरी वर्गाची गळचेपी होताना दिसत आहे. पालीत एका ठिकाणी विकासकाने अनधिकृत बांधकाम करीत पूर्वापार वहिवाटीचा रस्ता अडवल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे.
सरकारी आदेश धुडकावून अनधिकृत बांधकाम करून रस्ता अडविल्या प्रकरणी शेतकरी वर्गात संताप उसळला आहे. यासंदर्भात पाली तहसीलदार यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे. किसान एकता संघाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव वंदना मोरे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी विकासकाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठविला.
सदर तक्रारी निवेदनात नमूद केले आहे की येथील विकासक गौतमचंद् जैन, वाशी, नवी मुंबई यांनी सर्व्हे नंबर 156/3, 156/5, 163/1, 163/2 , 163/3, 157/4, 163/4, 163/5, या मिळकतीच्या जमिनीत जाणारा वडिलोपार्जित पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम करून सदरचा रस्ता बंद केला असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असता सदर बाबींची चौकशी करून लगतच्या शेतकर्यांच्या शेतात जानेकरिता पश्चिम बाजूने 12 मीटरचा रस्ता शेतीपर्यंत करून देण्याचे सरकारी आदेश देण्यात आले आहेत. या सरकारी आदेशाला न जुमानता जैन यांनी रस्त्यामध्ये अडथळे निर्माण केले असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सदर बांधकामा दरम्यान सर्व सिमेंट मिश्रित पाणी, शेतीत येऊन शेतीचे नुकसान होत आहे. आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे, शेतीचे नुकसान झाल्यास आमच्या वर उपासमारीची वेळ येईल असे तक्रारदार शेतकर्यांनी म्हटले आहे. शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जोपर्यंत शेतकर्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे वंदना मोरे यांनी परखडपणे सांगितले.
यावेळी किसान एकता संघाच्या महिला मोर्चा राष्ट्रीय सचिव वंदना मोरे , अरुण सखाराम कोंजे, सुगंधा अरुण कोंजे, कांचन कोंजे, सानिका कोंजे, अक्षय कोंजे, सुरज कोंजे आदींसह स्थानिक, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी शेतकर्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ठिकाणाला भेट दिली जाईल, तसेच संबंधित विकासक व तक्रारदार शेतकरी यांची बैठक बोलावून योग्य तो समनव्य साधून यावर तोडगा काढू, असे तहसीलदार यांनी आश्वाशीत केले आहे.